परीक्षेला जाण्यापूर्वी....!!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2016 12:34 PM2016-10-04T12:34:54+5:302016-10-04T18:04:54+5:30
परीक्षा द्वितीय सत्राची असो की अंतिम सत्राची, विद्यार्थ्यांमध्ये ताणतणाव वाढतोच.
Next
परीक्षा द्वितीय सत्राची असो की अंतिम सत्राची, विद्यार्थ्यांमध्ये ताणतणाव वाढतोच. यावेळी त्यांच्यावर मानसिक दडपण येतच असते. कारण केलेल्या मेहनतीचा खरा कस परीक्षांमध्येच लागत असतो. याकाळात विद्यार्थ्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. मग परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना नेमका कोणता आहार द्यावा? कोणता आहार टाळावा? तसेच परीक्षेला जाण्यापूर्वी काय काळजी घ्यावी, याबाबत आजच्या सदरात ‘लोकमत’ सीएनएक्सने घेतलेला आढावा...
सकस आहाराचे महत्त्व-
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या मनावर विशेष दडपण असते. त्यातच आहाराच्या बाबतीत हेडसांड झाल्याने परीक्षेदरम्यान विद्यार्थी आजारी पडतात आणि त्यांचे शारीरिक संतुलनाबरोबरच मानसिक संतुलनदेखील बिघडते. म्हणूनच पालकांनी परीक्षेच्या काळात आपल्या पाल्याच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे. परीक्षेच्या काळात वाचन, मनन, चिंतन करणे तसेच अधिक गुण मिळविण्यासाठी करण्यात येत असलेली धडपड यामुळे मेंदूचे कार्य वाढते आणि पर्यायी थकतो. यामुळे शारीरिक व बौद्धीक झीज भरून काढण्यासाठी योग्य व सकस आहार देणे महत्त्वाचे आहे. यामुळे मेंदूवरील ताण तर कमी होतो शिवाय मेंदूच्या पेशींना मुबलक पोषक घटक मिळाल्याने स्मरणशक्तीदेखील वाढते.
परीक्षेपूर्वी कोणता आहार घ्याल ?
परीक्षेदरम्यान निरुत्साहीपणा वाटू नये म्हणून मुलांना रक्तातील साखरेचे प्रमाण वाढेल असे अन्नपदार्थांबरोबरच अधिकाधिक पोषक आहार द्यावा. त्यात सुकामेवा, मिल्कशेक, व्हेजिटेबल सॅन्डविच, फळं व पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य आदींचा समावेश असावा. तसेच परीक्षेला जाण्यापूर्वी दही व साखरदेखील द्यावी. कारण दही साखरेच्या सेवनामुळे शरीराला थंडावा मिळतो, तसेच सतत उर्जा मिळते.
परीक्षेपूर्वी कोणता आहार टाळाल ?
अतिशय मेदयुक्त आणि प्रीझवेटीव्ह टाकलेले पदार्थ कटाक्षाने टाळा, कारण अशा पदार्थामुळे मुलांना परीक्षेदरम्यान थकवा जाणवेल आणि याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर पर्यायी निकालावर जाणवेल. तसेच पिझ्झा, बर्गर, वडे, समोसे, फळांचा कृत्रिम रस आदी पदार्थांचाही आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. हे पदार्थ मेंदूच्या पेशींसाठी हानीकारक असून मानसिक संतुलन बिघडते. त्यामुळे परीक्षेच्या काळात बाहेरचे काहीही न देता घरगुती बनविलेलेच अन्नपदार्थ द्यावेत. यामुळे विद्यार्थ्यांना कोणतेही पोटाचे विकार होणार नाहीत. आहाराबरोबरच पुरेशी झोप घेणे व भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
अभ्यास आणि परीक्षेबाबत काही टिप्स :
जर आपल्याला परीक्षेत चांगले मार्क्स हवे असतील तर आपणास अभ्यासासाठी काही नियमावली बनवावी लागेल आणि त्याची अंमलबजावणीदेखील करावी लागेल. त्यातच मनापासून अभ्यास तर हवाच शिवाय चांगल्या पुस्तकांचे वाचनही हवे. तसेच स्वत:च्या चांगल्या नोट्सदेखील तयार करायला हव्यात. या नोट्स आपल्याला परीक्षेला जाण्यापूर्वी खूप उपयुक्त ठरतात. आपण जो काही अभ्यास केला असेल त्याचा लिखानातून वेळोवेळी सराव करावा. तसेच प्रत्येक दिवशी अभ्यासाबरोबरच मनोरंजनालाही पूरेसा वेळ द्या. जो पण अभ्सास कराल तो एकाग्रतेने करा. कारण एकाग्रतेशिवाय परीक्षेत यश मिळविणे कठीण आहे.
परीक्षेची भिती नको
परीक्षेबाबत उगाच भिती बाळगून मनावर ताण येऊ देऊ नये. यासाठी आहाराबरोबच पूरेशी झोप घ्या. पूरेशा झोपेअभावी आपण कोणतेच काम चांगल्या पद्धतीने करु शकत नाही. विशेषत: अभ्यासासाठी चांगली झोप अत्यंत महत्त्वाची आहे. परीक्षा कक्षेत नेहमी वेळेच्या अगोदर पोहचा. परीक्षेत अगोदर असे प्रश्न सोडवा ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहज जमतात. कठीण प्रश्न नंतर सोडवा. परीक्षेअगोदर अशा गप्पा मारु नका, ज्यामुळे आपल्यात अनावश्यक ताण वाढेल. परीक्षेदरम्यान आपण संयमी जीवन व्यतीत करावे. तरच आपण एक यशस्वी विद्यार्थी बनू शकाल आणि जीवनातदेखील यश संपादन कराल.