दुधापेक्षाही जास्त फायदेशीर असते दूधाची पावडर; सौंदर्य वाढवण्यासाठी असा करा वापर!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 11:43 AM2018-08-15T11:43:19+5:302018-08-15T11:50:56+5:30
आपल्या त्वचेचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी दूधाचा फार उपयोग होतो, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. अनेकदा त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी कच्चं दूध, किंवा दुधाचेचं पदार्थ म्हणजे दही, मलई यांसारख्या पदार्थांचा वापर करण्यात येतो.
आपल्या त्वचेचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी दूधाचा फार उपयोग होतो, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. अनेकदा त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी कच्चं दूध, किंवा दुधाचेचं पदार्थ म्हणजे दही, मलई यांसारख्या पदार्थांचा वापर करण्यात येतो. त्याचप्रमाणे दुधाच्या पावडरचाही त्वचेसाठी वापर करता येतो. जाणून घेऊयात दुधाच्या पावडरपासून तयार करण्यात येणाऱ्या 4 फेसपॅकबाबत. यांच्या वापरामुळे त्वचेचं सौंदर्य राखण्यासाठी मदत होईल त्याचप्रमाणे त्वचा मुलायम आणि तजेलदार होईल.
दुधाच्या पावडरमुळे त्वचेला होणारे फायदे -
- दुधाच्या पावडरमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-ई असतं. ते त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी मदत करतात.
- यामध्ये व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात असतं. ज्याच्या वापरामुळे त्वचेवर दिसणारी वाढत्या वयाची लक्षणं कमी होण्यास मदत होते.
- दुधाच्या पावडरमध्ये असलेलं व्हिटॅमिन-बी6 त्वचेसाठी फायदेशीर असतं. यामुळे त्वचा मुलायम होण्यासाठी मदत होते.
- दुधाच्या पावडरमध्ये लॅक्टिक अॅसिड असतं. त्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.
- निस्तेज त्वचा उजळवण्यासाठीही दुधाची पावडर फायदेशीर ठरते.
- दुधाच्या पावडरच्या वापरामुळे ब्लॅकहेड्स, व्हाइटहेड्स यांसारख्या त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळते.
1. दुधाची पावडर + संत्र्यांचा रस + बेसन
दुधाच्या पावडरप्रमाणेच संत्र्यांच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. याचा वापर करून काळपट झालेल्या त्वचेचा रंग उजळवण्यासाठी मदत होते. बेसन मृत पेशी काढण्यासाठी फायदेशीर असते.
क्रिया - एका छोट्या बाउलमध्ये एक चमचा बेसन आणि एक चमचा दुधाची पावडर घ्या. त्यानंतर त्यामध्ये संत्र्याचा रस मिक्स करा. त्याची पेस्ट तयार करा. 10 ते 15 मिनिटांसाठी ही पेस्ट त्वचेवर लावा. त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका.
2. दुधाची पावडर + दही + लिंबू
या तिन्ही गोष्टींमध्ये त्वचा उजळवण्यासाठी आवश्यक अशी तत्व आढळून येतात. सूर्य किरणांमुळे किंवा प्रदूषणामुळे त्वचेचा खरा रंग नाहीसा होतो आणि त्वचा निस्तेज होते. त्यामुळे दोन्ही समस्यांवर गुणकारी ठरते.
क्रिया - एका बाउलमध्ये दोन चमचे दुधाची पावडर, दोन चमचे दही आणि अर्धं लिंबू टाका आणि मिक्स करा. त्याची एक घट्ट पेस्ट तयार होईल. ही पेस्ट लावण्याआधी 2 मिनिटं पाण्याने चेहऱ्याला वाफ द्या. त्यामुळे चेहऱ्याच्या पोर्स ओपन होतील. त्यानंतर चेहऱ्यावर ही पेस्ट लावून 20 मिनिटांपर्यंत ठेवा. त्यानंतर पाण्याने चेहरा धूवून घ्या.
3. दुधाची पावडर + हळद + मध
डार्क आणि ड्राय स्कीन असणाऱ्यांसाठी हा फेस पॅक फार गुणकारी ठरतो. या तिन्ही गोष्टींमध्ये त्वचेवरील बॅक्टेरिया काढून टाकण्यासाठी उपयुक्त असे घटक असतात. हळद त्वचा उजळवण्यास मदत करते. तसेच मध त्वचा मुलायम बनवण्यास मदत करते.
क्रिया - एका बाउलमध्ये एक चमचा मिल्क पावडर घ्या. त्यामध्ये थोडी हळद आणि एक चमचा मध मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून टाका.
4. दुधाची पावडर + मुलतानी माती
तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी हा फेस पॅक अत्यंत फायदेशीर ठरतो. दुधाच्या पवडरमध्ये असणारं व्हिटॅमिन सी चेहऱ्यावरील घाण काढून टाकण्यास मदत करतं आणि मुलतानी माती चेहऱ्यावरील ऑईल कमी करतं.
क्रिया - एका बाउलमध्ये एक चमचा मिल्क पावडर आणि एक चमचा मुलतानी माती टाका. यामध्ये गरजेनुसार गुलाब पाणी टाकून एक घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका.
टिप : वरील फेस पॅकचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.