कमी वयातच पांढरे झालेत केस?; 'या' आजाराचं असू शकतं लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 12:44 PM2019-10-02T12:44:58+5:302019-10-02T12:45:49+5:30
वाढणारं प्रदुषण आणि अनहेल्दी इटिंग हॅबिट्समुळे सध्या केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. एवढच नाहीतर सध्या लहान वयातच अनेकांना पांढऱ्या केसांच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
वाढणारं प्रदुषण आणि अनहेल्दी इटिंग हॅबिट्समुळे सध्या केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. एवढच नाहीतर सध्या लहान वयातच अनेकांना पांढऱ्या केसांच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. अनेकदा कमी वयात केस पांढरे होण्याबाबत असं सांगितलं जातं की, तुम्हाला हृदयाशी निगडीत आजार होण्याचा धोका बळावू शकतो. असं एका संशोधनातून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जर तुम्ही हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी उपाय शोधत असाल तर सर्वात आधी पांढऱ्या केसांकडे लक्ष द्यायला सुरुवात करा.
द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, पांढऱ्या केसांची समस्या बऱ्याचदा अशा पुरूषांमध्ये दिसून येतात की, ज्यांचे केस फार कमी वयातच पांढरे होतात. जर तुम्हाला दिर्घायुषी व्हायचं असेल आणि हृदयरोगांपासून स्वतःचं रक्षण करायचं असेल तर काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही वाढत्या वयातही केसांचा काळा रंग टिकवून ठेवू शकता आणि हृदय रोगांपासूनही स्वतःचा बचाव करू शकता.
पांढरे केस पुन्हा काळे करण्यासाठी काही घरगुती उपाय...
- एक काळी मिरी घेऊन त्याची पावडर तयार करा. यासाठी काळ्या मिरीचे काही दाणे पाण्यामध्ये टाकून थोड्या वेळासाठी उकळवत ठेवा. केस धुताना या पाण्याने केस धुवा. एक ते दोन महिन्यांसाठी हा उपाय ट्राय करा.
- कढिपत्त्याची पानं फक्त जेवणाची चव वाढवत नाहीत, तर यामुळे केसांच्या अनेक समस्यांवरही उपाय करणं शक्य होतं. पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी पाण्यामध्ये कढिपत्त्याची पानं उकळून घ्या. हे पाणी थंड झाल्यानंतर त्या पाण्याने केस स्वच्छ करा. तसेच तुम्ही कढिपत्त्याच्या पानांचा रस काढून तो खोबऱ्याच्या तेलामध्ये एकत्र करून केसांना लावू शकता.
- कोरफड फक्त त्वचेसाठीच नाहीतर केसांसाठीही फायदेशीर ठरते. कोरफडीचा गर काढून केसांना लावल्याने केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी मदत होते. याचा सतत वापर केल्याने केस तुटण्याची समस्या कमी होते. कोरफडीच्या जेलमध्ये लिंबाचा रस एकत्र करून केसांना लावल्याने केस काळे आणि चमकदार होतात.
- कांद्याचा रसही केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो, असं आपण अनेकदा ऐकतो. पण केसांसाठी या रसाचा वापर नक्की कसा करायचा हे अनेकांना माहीत नसतं. एका कांद्याचा रस तयार करून केस धुण्याआधी त्याची पेस्ट व्यवस्थित अप्लाय करा. पांढरे केस हळूहळू काळे होतील. एवढचं नाहीतर केस मुलायम आणि चमकदारही होतील. तसेच केसांमधील कोंडाही कमी होतो.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)