फक्त हे दोन पदार्थ वापरा; उन्हाळ्यातील चिकट केस अन् केसगळती विसरा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 06:14 PM2021-05-09T18:14:06+5:302021-05-09T18:14:41+5:30
उन्हाळ्यात केस चिकट आणि तेलकट झाल्यावर हा घरगुती कंडिशनर वापरा. पैशांचीही बचत आणि केस होतील चमकदार व दाट...
उन्हाळ्यात सर्वात जास्त त्रास देतात ते चिकट केस. अनेकींना त्यांचे केस चिकट, तेलकट झाल्यासारखे वाटतात. त्यामुळे बऱ्याचजणी उन्हाळ्यात केस कापण्याचा पर्याय स्वीकारतात. मात्र, सध्या लॉकडाऊन झाल्यामुळे हा पर्यायही बंदच. पण खरंतर केस कापण्याची गरजच नाही. तुमचे लांब केस उन्हाळ्यामध्येही छान राहावेत असे तुम्हाला वाटत असेल तर यावरही पर्याय आहे.
खोबरेल तेल आणि मधाचं मिश्रण
बाजारातल्या महागड्या कंडिशनरचे अनेक तोटेही असतात. आजकाल आपल्यापैकी अनेकजण सौंदर्यप्रसाधनांसाठी आयुर्वेदिक प्रॉडक्ट्सचा वापर करतात. मग केसांसाठी खोबरेल तेल आणि मधाचं मिश्रण निश्चितच उत्तम आहे.
हे कंडिशनर बनवायचं आणि वापरायं कसं?
एक चमचा मध आणि दोन चमचे नारळाचं तेल एकत्र करा. केस धुण्याआधी ३० मिनिटे हे कंडिशनर केसांना लावा. साधारणत: कंडिशनर केस धुतल्यानंतर लावले जाते. पण हे घरच्याघरी तयार केलेले आयुर्वेदिक कंडिशनर केस धुण्याच्या आधीच लावावे लागते हे लक्षात ठेवा.
तसेच कंडिशनर आपण केसांच्या टोकांना लावतो मात्र हे कंडिशनर केसांच्या मुळापासून ते टोकांपर्यंत व्यवस्थित लावावे. लावून झाल्यानंतर शॉवर कॅप लावून ते वर म्हटल्याप्रमाणे ३० मिनिटे ठेवून द्यावे. नंतर शॅम्पूने केस धुवावेत.
याचे फायदे काय?
केस दाट आणि कमी कालावधीत लांब होतात...
या आयुर्वेदिक कंडिशनरमुळे केस दर दाट होतातच पण त्यांची लांबीही वाढते. फारच कमी कालावधीत तुमचे केस दाट आणि लांबसडक दिसू लागतात.
केसगळती कमी होते
तुमची केस मोठ्याप्रमाणावर गळत असली तर त्यांची गळती मोठ्या प्रमाणावर कमी होते. त्याचप्रकारे केस तुटण्याचे प्रमाणही कमी होते. केसांचं पोषण अधिक वाढते. मधामुळे तुमच्या स्काल्पला भरपूर फायदा होतो. तुमचे केस दाट राहण्यात मध महत्वाची भूमिका बजावते.
केसातील अतिरिक्त तेल कमी होते
थंडीत केस कोरडे होतात. तर उन्हाळ्यात तेलकट. या कंडिशनरमुळे केसांचा तेलकटपणा कमी होतो. केस सॉफ्ट आणि चमकदार होतात.