दात चमकवण्यासाठी टूथपेस्टचं 'इतकंच' प्रमाण योग्य, ना कमी ना जास्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 11:55 AM2018-09-05T11:55:52+5:302018-09-05T11:56:23+5:30
चमकदार आणि स्वच्छ दात सर्वांनाच हवे असतात. त्यामुळे अनेकांना असं वाटतं की, दात चमकदार करण्यासाठी अधिक प्रमाणात टूथपेस्ट वापरलं पाहिजे.
चमकदार आणि स्वच्छ दात सर्वांनाच हवे असतात. त्यामुळे अनेकांना असं वाटतं की, दात चमकदार करण्यासाठी अधिक प्रमाणात टूथपेस्ट वापरलं पाहिजे. यासाठी काही लोक ब्रशवर भरपूर प्रमाणात टूथपेस्ट लावतात. पण अधिक प्रमाणात टूथपेस्ट वापरणे म्हणजे अधिक चमकदार दात असं होत नसतं. याउलट असे केल्यास गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागलीत.
किती वापरावं टूथपेस्ट
दात स्वच्छ करण्यासाठी भरपूर प्रमाणात टूथपेस्टचा वापर करण्याचा गैरसमज पसरवण्यात फक्त टूथपेस्टच्या जाहिराती जबाबदार आहेत. सत्य हे आहे की, दात योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी केवळ मटरच्या आकाराएवढं टूथपेस्ट वापरणं पुरेसं आहे. ६ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांबाबत सांगायचं तर टूथपेस्टचं प्रमाण हे तांदळाच्या दाण्याएवढं असायला हवं.
लहान मुलांना होऊ शकतो हा आजार
टूथपेस्टचं प्रमाण कमी यासाठी वापरावं कारण अनेक मुले काही प्रमाणात टूथपेस्ट गिळतात. ज्यामुळे त्यांना फ्लोरोसिस हा आजार होऊ शकतो. हा एक असा आजार आहे ज्यात फ्लोराइडचं अधिक प्रमाण असल्याने दातांवर भुरकट रंगांचे डाग तयार होतात. तेच प्रौढांनी फ्लोराइडचा अधिक वापर केला तरी त्यांना त्यातून कोणताही आजार होत नाही. पण टूथपेस्टचा अधिक वापर टूथपेस्ट वाया घालवण्यासारखे आहे. कारण दात योग्यप्रकारे स्वच्छ होण्यासाठी ब्रशचे ब्रिसल्स(ब्रशचे दाते) योग्य असणे गरजेचे आहे.
एवढंच योग्य प्रमाण
दात स्वच्छ करण्यासाठी आणि चमकवण्यासाठी तुम्हाला केवळ मटरच्या दाण्याएवढंच टूथपेस्ट वापरायचं आहे. कार टूथपेस्टचा मुख्य उद्देश दातांना फ्लोराइड आणि काही प्रमाणात चमक देणे हा आहे.