उन्हाळ्यात केसांची आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी खास घरगुती उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 11:08 AM2019-03-27T11:08:25+5:302019-03-27T11:14:15+5:30
सुंदर आणि आकर्षक चेहरा प्रत्येक व्यक्तीला हवा असतो. त्यासाठी काळजीही घेतली जाते.
(Image Credit : Morethanglam)
सुंदर आणि आकर्षक चेहरा प्रत्येक व्यक्तीला हवा असतो. त्यासाठी काळजीही घेतली जाते. पण उन्हाळा आल्यावर कितीही काळजी घ्या काहीना काही समस्या होतातच. उन्हाळ्यात केवळ त्वचेचीच नाही तर केसांचीही जरा जास्त काळजी घ्यावी लागते. अशावेळी काही सामान्य टिप्सचा वापर करता येईल.
उन्हात बाहेर जाणे गरजेचे असेल तर सनस्क्रीन लोशन लावून बाहेर पडायला पाहिजे व छत्रीचा वापर करावा. प्रखर सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे केसांचे आरोग्य फारच खराब होते म्हणून केसांना बांधूनच बाहेर जाणे योग्य. उन्हाळ्याच्या दिवसात घामाने आपण सगळेच जण अत्यंत बेजार झालेलो असतो. अशातच महिलांना घामट झालेल्या लांबसडक केसांची काळजी कशी घ्यावी, हा प्रश्न पडलेला असतो. मात्र उन्हाळ्यातही केसांचं सौंदर्य कायम राखण्यासाठी या काही ब्यूटी टिप्स :
१. मेंहदी कंडिशनरचे काम करत असल्यामुळे, केसांचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी प्रत्येक १५ दिवसांनी मेंदी लावायला पाहिजे. त्याशिवाय आठवड्यातून किमान एकदा अंडे आणि दह्याचा वापर केला पाहिजे.
२. बेसन, लिंबाचा रस आणि दही सारख्या प्रमाणात घेऊन केसांची मसाज करून डोकं धुवायला पाहिजे. सर्वात शेवटी केसांना लिंबाच्या पाण्याने धुवावे. त्यानंतर नॉर्मल पाण्याने धुवावे.
३. १ वाटी मेंहदीत आवळा, शिकेकाई, रिठा, मेथी, कडूलिंब, तुळशीची पाने १-१ चमचा घेऊन दह्यात मिश्रित करावे, त्यात अर्ध्या लिंबाचा रस घालून केसांना लावून १ तास तसेच राहू द्यावे, याने केस मजबूत होतील व केसांना चमक येईल.
४. थोडं गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्या पाण्याने केस धुवावे. कोरड्या केसांमध्ये वेगळीच चमक मिळेल तसेच ते मुलायम होतील.
१. उन्हाळ्यात चेहरा टवटवीत आणि तजेलदार राखण्यासाठी दोन चमचे बेसन, हळद, गुलाब पाणी व मध घालून त्याचा लेप बनवून चेहरा, हात-पाय आणि मानेवर लावून १० मिनिटाने धुऊन टाका. त्याने त्वचा सुंदर व ताजी बनेल.
२. डोळ्यांची आग आणि डार्क सर्कल कमी करण्यासाठी रात्री झोपताना डोळ्यांवर थंड दुधाच्या पट्ट्या ठेवाव्या. काही वेळ काकडीचाही वापर करू शकता.
३. ओठांना सुंदर व मऊ बनविण्यासाठी रात्री झोपताना दुधाची साय लावायला पाहिजे, सकाळी थंड पाण्याने ओठ धुवावे.
४. दुधात हळद घालून त्याची पेस्ट तयार करावी, ही पेस्ट चेहरा आणि हाता-पायावर लावावी. १० मिनिटाने हात-पाय आणि चेहरा पाण्याने धुवावा.
५. ८-१० दिवसाने एकदा चेहऱ्यावर वाफ जरूर घ्यावी. या पाण्यात पुदीन्याची पानं, तुळशीची पानं, लिंबाचा रस व मीठ घालावे. वाफ घेतल्यानंतर याच कोमट पाण्यात 5 मिनिट हात ठेवावे त्याने हातसुद्धा मऊ होतात.