आरोग्यासोबतच त्वचेसाठीही गुणकारी ठरतं गव्हाचं पीठ; असा करा वापर!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 11:48 AM2018-08-21T11:48:49+5:302018-08-21T11:52:10+5:30
गव्हाच्या पीठाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. भारतात गव्हाच्या पीठाचा वापर सर्वाधिक करण्यात येतो. रोज दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात गव्हाच्या पीठापासून तयार करण्यात आलेल्या चपात्यांचा समावेश करण्यात येतो.
गव्हाच्या पीठाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. भारतात गव्हाच्या पीठाचा वापर सर्वाधिक करण्यात येतो. रोज दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात गव्हाच्या पीठापासून तयार करण्यात आलेल्या चपात्यांचा समावेश करण्यात येतो. गव्हामध्ये असणारी फायबर, व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन्स यांसारखी पोषक तत्वे आरोग्याच्या विविध समस्यांवर गुणकारी ठरतात. परंतु, गहू आणि गव्हाच्या पीठापासून त्वचेलाही अनेक फायदे मिळतात. जाणून घेऊयात गव्हामुळे त्वचेला होणारे आरोग्यदायी फायदे...
गव्हापासून त्वचेला होणारे फायदे -
- त्वचेवर गव्हाचं पीठ लावल्यानं त्वचा उजळण्यास मदत होते.
- उन्हामुळे झालेलं टॅनिंग गव्हाच्या पीठामुळे कमी होण्यास मदत होते.
- चेहऱ्यावरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी गव्हाचं पीठ फायदेशीर ठरतं.
- त्वचेवर नैसर्गिक ग्लो आणण्यासाठी गव्हाचं पीठ फायदेशीर ठरतं.
- तेलकट त्वचेवर उपाय म्हणून गव्हाच्या पीठाचा वापर करता येतो.
- कोणत्याही प्रकारच्या त्वचेच्या समस्यांवर गव्हाच्या पीठाचा वापर करता येतो.
- गव्हाच्या पीठाचा वापर करून त्वचेसाठी उपयुक्त असे फेस पॅक करता येतात.
- गव्हाच्या पीठाचे फेस पॅक नेहमी रात्री झोपण्याआधी 15 ते 20 मिनिटं आधी चेहऱ्यावर लावावे.
गव्हाच्या पीठापासून असे तयार करा फेस पॅक
1. उन्हामुळे काळवंडलेली त्वचा उजळवण्यासाठी
एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घ्या. त्यामध्ये थोडं पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट उन्हामुळे काळवंडलेल्या त्वचेवर लावा. साधरण 10 मिनिटांपर्यंत ठेवल्यानंतर हाथ थोडे ओले करून हलक्या हाताने त्वचेवर मसाज करा. चेहऱ्यावरील पेस्ट निघून जाईल. त्यानंतर त्वचा धुवून टाका. दिवसातून किमान 2 वेळा असे केल्याने त्वचा उजळण्यास मदत होईल.
2. नैसर्गिक ग्लो आणण्यासाठी
एका बाउलमध्ये 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ घ्या आणि त्यामध्ये समप्रमाणात मिल्क क्रिम घालून एक पेस्ट तयार करा. पेस्ट तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा आणि 10 ते 15 मिनिटं सुकू द्या. त्यानंतर हात थोडे ओले करून हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करत चेहऱ्यावरून काढून टाका. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. त्वचा चमकदार होईल. आठवड्यातून 2 ते 3 वेळा असे केल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येईल.
3. तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी
एका बाउलमध्ये 3 ते 4 चमचे गव्हाचं पीठ घ्या. त्यामध्ये आवश्यक तेवढं दूध घालून पेस्ट तयार करा. त्यानंतर त्यामध्ये 3 ते 4 गुलाबपाण्याचे थेंब टाका. ही पेस्ट 15 ते 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. आठवड्यातून 3 वेळा असे केल्याने तेलकट त्वचेची समस्या दूर होईल.
4. त्वचा मुलायम होण्यासाठी
कोरड्या त्वचेच्या समस्येवर गव्हाच्या पीठापासून तयार करण्यात आलेला हा फेस पॅक उपयुक्त ठरेल. हा पॅक तयार करण्यासाठी गव्हाच्या पाठामध्ये दूध, गुलाब पाणी, मध मिक्स करून पेस्ट तयार करा. यामध्ये संत्र्यांच्या सालीची पवडरही घालू शकता. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. डोळ्यावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवा. जवळपास 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर चेहरा धुवून घ्या.