तुमच्या केसाचाच ‘विग’ मिळाला तर...; कॅन्सरमुळे होणाऱ्या केस गळतीवर महिलांसाठी उपाय
By संतोष आंधळे | Published: October 14, 2022 06:15 AM2022-10-14T06:15:59+5:302022-10-14T06:16:11+5:30
कर्करोगाच्या पेशी शरीरात अन्यत्र कुठे पसरू नयेत यासाठी विशिष्ट औषधांचा वापर केला जातो, या प्रणालीला किमोथेरपी असे संबोधले जाते.
- संतोष आंधळे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कर्करोगावर किमोथेरपी हा महत्त्वाचा उपचार आहे. मात्र, किमोथेरपीदरम्यान केस गळतात. त्यामुळे रुग्णांना कृत्रिम केसांचा विग वापरावा लागतो. याचा रुग्णावर विशेषत: महिलांवर अधिक परिणाम होतो. महिला रुग्ण अधिकच खचतात. त्यावर उपाय म्हणून आता काही महिला कर्करुग्णांनी किमोथेरपीला सुरुवात होण्याआधीच स्वत:चे केस काढून त्यांचा विग तयार करून घेतले आहेत. स्वत:च्या केसांचा विग घातल्याने रुग्णांचा आत्मविश्वास दुणावत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ मांडत आहेत.
कर्करोगाच्या पेशी शरीरात अन्यत्र कुठे पसरू नयेत यासाठी विशिष्ट औषधांचा वापर केला जातो, या प्रणालीला किमोथेरपी असे संबोधले जाते. भारतात महिलांमध्ये स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग अधिक प्रमाणात आढळतो. अशा कर्करुग्णांना किमोथेरपीला सामोरे जावे लागते. त्यांना उपचारादरम्यान केस गळण्याची पूर्वकल्पना दिली जाते. अशा महिला रुग्ण किमोथेरपीला सुरुवात करण्यापूर्वी स्वतःचे केस काढून ते केसाचा विग बनवून घेतात आणि किमोथेरपीच्या दरम्यान किंवा त्यानंतर ज्यावेळी सार्वजनिक ठिकाणी त्या वावरत असतात त्यावेळी तो विग घालून फिरतात.
केस दानाची गरज
केस दानाची मोहीम राबवून नैसर्गिक केसांचे विगही तयार केले जातात. एका विगसाठी तीन-चार व्यक्तींनी दान केलेल्या केसांची गरज भासते. अनेकदा विग तयार करताना केसांची निवड, रंग, पोत या सगळ्याची प्रतवारी करताना काही प्रमाणात केसांचा अपव्यय होतो. त्यामुळे अधिकाधिक महिलांनी केस दान करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.
आमच्याकडे काही महिला किमोथेरपी सुरू करण्याच्या आधी येतात. त्यांचे केस आम्ही आमच्या सलूनमध्ये कारागिरांच्या मदतीने काढून घेतो. आठवड्याच्या कालावधीत त्यांना त्यांच्याच केसाचा विग बनवून परत देतो. स्वतःच्या केसांचा विग असल्यामुळे महिलांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास असतो. महिन्याला १० ते १५ असे स्वतःचे केस दिलेल्या महिलांचे विग बनवून देतो. ज्यांना याबाबत माहिती अशा महिला पुढे येऊन विग बनवून घेऊन जात असतात. काही महिलांना केसाचे विग परवडत नाही, अशा महिलांसाठी आम्ही सिन्थेटिक सामानाचा वापर करून विग बनवतो आणि गरजू रुग्ण महिलांना तो मोफत देतो.
- नीलम गेहानी, अंधेरी,नीलम ब्यूटी अँड मेडिकेअर सलूनच्या मालक.
किमोथेरपीनंतर केस जाऊ शकतात याची माहिती रुग्णांना दिलेली असते. त्यामुळे काही रुग्ण किमोथेरपी चालू होण्याच्या आधीच त्यांचे केस सलूनमध्ये देतात आणि त्याचा विग बनवून घेतात. त्यामुळे त्यांना तो विग असा कृत्रिम दिसत नाही. अनेक महिला या सुविधेचा फायदा घेत आहेत
- डॉ. मंदार नाडकर्णी, स्तनाच्या कर्करोगाचे शल्यचिकित्सक
हा खरंच खूप चांगला प्रकार आहे आणि तो वाढण्याची गरज आहे. लोकमंध्ये हळूहळू जनजागृती येत आहे. सिन्थेटिक विगपेक्षा स्वतःच्या केसांचा विग दिसायला चांगला आणि त्याला नैसर्गिकपणा असतो. सिन्थेटिक विगची काही लोकांना ॲलर्जी असते किंवा काहींना पुरळ उठते.
- डॉ. सचिन आलमेल, औषध वैद्यकशास्त्रातील कर्करोग तज्ज्ञ