निरोगी आणि चमकदार दात हवेत? या 7 चुका टाळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 12:26 PM2018-08-25T12:26:56+5:302018-08-25T12:27:40+5:30
आधीच काही गोष्टींची काळजी घेतली तर हा सगळा खटाटोप टाळता येऊ शकतो. खालील चुका टाळल्यास तुमचे दात निरोगी आणि चमकदार राहतील.
(Image Credit : justicedental.com)
निरोगी आणि चमकदार दात सर्वांनाच हवे असतात. त्यासाठी काहीजण वेगवेगळे उपायही करत असतात. काहीजण भरमसाठ पैसाही खर्च करतात. पण खर्च करुनही काही उपयोग होत नाही. पण अशावेळी आधीच काही गोष्टींची काळजी घेतली तर हा सगळा खटाटोप टाळता येऊ शकतो. खालील चुका टाळल्यास तुमचे दात निरोगी आणि चमकदार राहतील.
१) दातांच्या फटीत अडकलेले अन्नकण काढण्यासाठी टूथपिकचा वापर करू नये. टूथपिक वापरल्याने दातांवर ओरखडे उठण्याचा व हिरड्यांना इजा होण्याचा धोका असतो. यामुळे तुम्हांला हिरड्यांशी संबंधीच आजार होऊ शकतात.
२) दातांच्या फटीत अडकलेले अन्नकण काढण्यासाठी फ्लॉसचा वापर करावा. फ्लॉसमुळे अन्नकण पूर्णपणे निघतात. त्यामुळे हिरड्यांचा बॅक्टेरियापासून बचाव होतो व हिरड्या निरोगी राहण्यास मदत होते.
३) दररोज सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना टंग क्लिनरने किंवा ब्रशने जीभ स्वच्छ करावी. जीभ स्वच्छ करण्यासाठी फार वेळ लागत नाही. परंतु यामुळे तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीपासून बचाव होतो.
४) दात किडणे आणि हिरड्यांच्या आजारापासून वाचण्यासाठी माउथवॉशने गुळणी करणे आवश्यक आहे. तोंड आलेले असल्यास माउथवॉशमुळे त्यातील बॅक्टेरियाचा नाश होण्यास मदत होते. माउथवॉशमुळे तोंडाला येणारी दुर्गंधीही टाळता येते. परंतु माउथवॉश वापरण्यापूर्वी बाटलीवरील सूचना आठवणीने वाचाव्यात.
५) दातांमधील पोकळ्यांकडे दुर्लक्ष करू नका. दातांच्या फटींमध्ये अन्नकण अडकत असतील तर दात किडण्याचा धोका असतो. कालांतराने दात किडून जास्त दुखू लागल्यावर डॉक्टर रूटकॅनाल करण्याचा सल्ला देतात.
६) पांढरेशुभ्र आणि चमकदार दात मिळवण्यासाठी खरखरीत टूथपेस्ट किंवा टूथपावडर वापरू नये. त्यामुळे दात काळे पडून कालांतराने दातांचे इनॅमल खराब होण्याचा धोका असतो.
७) बऱ्याच जणांना रात्री दात घासण्याची सवय नसते. रात्री जेवल्यानंतर दातांच्या फटींमध्ये अन्नकण अडकतात. तोंडातील बॅक्टेरिया या अन्नकणांतील शर्करेचे शुगर अॅसिडमध्ये रुपांतर करतात. रात्री जेवल्यानंतर दात घासले नाहीत तर, या शुगर अॅसिडमुळे दातांचे इनॅमल खराब होऊन दात पिवळे पडण्याचा धोका असतो. त्यासाठी दररोज सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना दात घासावेत.