Navratri 2019 : उपवासासोबत चेहऱ्याचं सौंदर्यही जपायचंय?; 'या' टिप्स तुमच्यासाठीच...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 01:19 PM2019-09-25T13:19:48+5:302019-09-25T13:20:32+5:30
नवरात्रोत्सव सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशातच नवरात्रीमध्ये अनेक लोक उपवास करतात. काही फक्त पहिल्या दिवशी तर काही लोक नऊ दिवसांचा उपवास करतात.
नवरात्रोत्सव सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशातच नवरात्रीमध्ये अनेक लोक उपवास करतात. काही फक्त पहिल्या दिवशी तर काही लोक नऊ दिवसांचा उपवास करतात. यावर्षी नवरात्रोत्सव 29 सप्टेंबरपासून 7 ऑक्टोबरपर्यंत साजरा करण्यात येणार आहे. पुरूष आणि महिला दोघेही मोठ्या श्रद्धेने या दिवसांमध्ये उपवास करतात. महिला उपवास तर करतात पण काही दिवसांतच त्यांच्या चेहऱ्यावरील तेज नाहीसं होतं. जर तुम्हाला असं वाटत असेल की, उपवास ठेवण्यासोबतच तुमचं आरोग्य आणि त्वचा देखील हेल्दी राहावी तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
चेहऱ्याची त्वचा राहिल चमकदार
अनेकदा जास्त दिवस उपवास केल्याने चेहऱ्याची चमक नाहीशी होऊ लागते. डोळ्यांखाली काळी वर्तुळं दिसू लागतात. असं होण्यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे, नऊ दिवस काहीही न खाणं तसेच या दिवसांत व्यवस्थित आहार न घेणं. जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य टिकवून ठेवायचं असेल तर नवरात्रीमध्ये उपवासासाठी या खास पदार्थांचं सेवन करा. त्यामुळे आरोग्यासोबतच त्वचेलाही फायदे होतील.
शिंगाडे
शिंगाडे पाण्यामध्ये उगवणारं एक पौष्टिक फळं आहे. हे नवरात्रीमध्ये सर्वात जास्त खाण्यात येतं. एवढचं नाहीतर शिंगाड्याच्या पिठापासून अनेक चवदार पदार्थ तयार करण्यात येतात. आरोग्यासाठी शिंगाडा अत्यंत फायदेशीर ठरतो. आरोग्याच्या समस्या दूर करण्यासोबतच त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी शिंगाडे मदत करतात. यामध्ये अस्तित्त्वात असणारी पौष्टिक तत्व शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करतात. हे अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टी-ऑक्सिडंटयुक्त असतात. जे ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी अत्यंत उत्तम पर्याय आहे.
साबुदाणे
नवरात्रीमध्ये साबुदाण्यांची खिचडी, खीर किंवा वडे खाण्यात येतात. हे पदार्थ अत्यंत चविष्ट असतात. साबुदाणा शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मदत करतो. त्वचेसाठीही हा अत्यंत उत्तम आहार आहे. ज्याचं सेवन तुम्ही नऊ दिवस करू शकता.
दही
दही त्वचेसाठी उत्तम मानला जातो. दह्यामध्ये असलेलं कॅल्शिअम हाडांना मजबुती देतं. तसेच त्वचेचं आरोग्य राखण्यासाठीही दह्याचा वापर करण्यात येतो. दह्याचं सेवन करण्यासोबतच त्वचेवर लावूही शकता. यामध्ये अस्तित्वात असणारे प्रोबायोटिक्स बॅक्टेरिया अनेक रोगांपासून बचाव करण्याचं काम करतात. कॅल्शिअम व्यतिरिक्त यामध्ये व्हिटॅमिन बी-2, बी-12, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम मुबलक प्रमाणात असतं. ही सर्व पोषक तत्व खाल्लेले पदार्थ पचवण्यासाठी मदत करतात. याव्यतिरिक्त पोटाच्या समस्या म्हणजेच, ब्लोटिंग, गॅस दूर करण्यासाठीही मदत करतं
ड्रायफ्रुट्स
ड्रायफ्रुट्स म्हणजेच, सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो हे आपण सर्वजण जाणतोच. यामध्ये फायबर व्हिटॅमिन आणि खनिज मुबलक प्रमाणात असतात. अॅन्टी-ऑक्सिडंट्स असल्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो. डायबिटीजचे रूग्ण असाल आणि उपवास करत असाल तर ड्राय फ्रुट्स खाणं अत्यंत फायदेशीर ठरतं. काजू त्वचा उजळण्यासाठी मदत करतं. तसेच मृत आणि निस्तेज त्वचेची समस्या दूर करण्यासाठीही मदत मिळते. अक्रोडमध्ये असलेले अॅन्टीएजिंग गुणधर्म त्वचेला नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी मदत करतात.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)