उत्तम आरोग्यासाठी मैदानी खेळ आवश्यक ...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2016 02:15 PM2016-07-03T14:15:14+5:302016-07-03T19:45:14+5:30
मैदानी खेळ विसरल्याने अलीकडे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत.
हल्लीचे युग हे धावपळीचे आहे. तसेच इलेक्ट्रॉनीक साधने करमणुकीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे अनेकजण मैदानावर खेळायला जाणेच विसरले आहेत. परंतु, त्याचे दुष्परिणामही भोगावे लागत आहेत. त्यामुळेच सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळ हे खूपच गरजेचे आहेत. बॉलीवूडमधील अनेक दिग्गज स्टारनी सुद्धा खेळावर आधारित चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत. यावरुनच उत्तम आरोग्यासाठी मैदानी खेळ हे किती आवश्यक आहे, हे वेगळी सांगण्याची गरज नाही.
पूर्वी कुस्ती, कबड्डी, विटूदांडू, सुरपारंबी, लपंडाव आदी खेळ हे कुठेही फावल्या वेळामध्ये मुले खेळत असे. मात्र, अलीकडे मुले एकत्र येऊनही, या खेळाऐवजी आपआपल्या मोबाईलमधील गेम खेळण्यातच दंग असतात. सोबत असूनही त्यांना एकमेकांना बोलण्यासाठीही पुरेसा वेळ मिळत नाही. घरी सुद्धा पालकांचे मुलांवर अभ्यासाचा दबाव असतो. रिकामा वेळ मिळाला तर त्यांच्या हातात मोबाईल किंवा टीव्हीचा रिमोट दिला जातो. त्यामुळे कॉर्टून पाहण्यात किंवा मोबाईल गेम खेळण्यातच वेळ जातो. रिकामा वेळ मिळूनही ते इलेक्ट्रॉनीक साधनातच रमून जातात. त्यामुळे मैदानी खेळच मुले काही प्रमाणात विसरत आहेत. तसेच शहरी भागात मैदाने उपलब्ध नसल्यानेही त्याचा खेळावर परिणाम झाला आहे.
मैदानी खेळ न खेळल्याचे परिणाम
मैदानी खेळ न खेळल्याने मुलांना अभ्यासातही निराशा येते. आळस येतो तसेच कोणतेच काम करण्यासाठी उत्साह वाटत नाही. मुलांचा स्वभावही एकलकोंडा होण्यास सुरुवात होते. मानवाच्या सर्वागीण विकासासाठी मैदानी खेळ हे खूप आवश्यक आहेत. एकाग्रता व दीर्घकाळ काम करण्याची क्षमता राहत नाही. तसेच आत्मविश्वासाचाही मनामध्ये अभाव असतो. शरीराचा बांधाही उत्तम राहत नसल्याने, पर्सनॅलिटीही उठवून दिसत नाही. मैदाने खेळ न खेळल्याने असे विविध प्रकारचे दुष्परिणाम आहोत.
खेळाचे फायदे
खेळामुळेच इतर गुणांचाही विकास होत असतो. त्यामुळे आपले सुप्त गुणही विकसित होत असतात.खिलाडी वृत्ती, सांघिक वृत्ती, सहकार्य करण्याची वृत्ती, नेतृत्व, स्पर्धात्मक वृत्ती, एकाग्रता, सहनशीलता, आत्मविश्वास या गुणांचा नियमित खेळामुळे विकास होतो. त्याकरिता मानवाला व्यायाम हा खूप आवश्यक आहे. त्याक डे दुर्लक्ष केले तर विविध प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्याकरिता क्रिकेट बरोबर अन्य मैदानी खेळही खेळणे आवश्यक आहेत.
बॉलीवूड स्टार खेळाडूच्या भूमिकेत
सुलतान या चित्रपटात सलमान खान हा कुस्तीपटू दाखविण्यात आला आहे. सलमानने यापूर्वी खेळाशी संबंधीत कोणत्यात चित्रपटात काम केलेला नाही. खेळाची आवड असूनही, सुलतान हा त्याचा खेळाशी संबंधीत पहिलाच चित्रपट आहे. प्रियंका चोप्रा हीने मेरी कोम मध्ये एक उत्तम बॉक्सींग पटूची भूमिका साकारलेली आहे. मुलगी असूनही तसेच घर व गावातून कोणतीही पार्श्वभूमी नसताना, ती बॉक्सींगमध्ये सर्वोच्च स्थानावर पोहचते. अशी या चित्रपटाची कहाणी आहे. आमीर खान, शाहरूख खान, फरहान खान यांनी सुद्धा खेळावर आधारित चित्रपटातून भूमिका केल्या आहेत.
----------------