सकारात्मक विचारांची जादू !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2016 07:56 AM2016-10-02T07:56:33+5:302016-10-02T14:19:24+5:30
सकारात्मक विचारांशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे. आपल्या जीवनात आलेले नैराश्य, अंधार आपण सकारात्मक विचारांच्या शक्तीने..............
विचार दोन प्रकारचे
आपल्या मनातील प्रत्येक विचार हा दोन प्रकारचा असतो. सकारात्मक आणि नकारात्मक. या विचारांवर आपला दृष्टिकोन किंवा व्यवहार अवलंबून असतो. विशेष म्हणजे आपण जसा विचार करतो, तसे बनतो. म्हणूनच म्हटले जाते की, आपला जसा विचार असतो तसेच आपले आचरणदेखील असते. मग आचरण कसे ठेवायचे हे मुळात आपल्यावर अवलंबून असते.
आपण कोणत्या रंगाचा चष्मा लावला आहे
आपण जर काळ्या रंगाचा चष्मा लावला असेल तर सर्वत्र काळे दिसेल आणि लाल रंगाचा असेल तर लाल दिसेल. याचप्रकारे नकारात्मक विचारांमुळे आपल्याला सर्वत्र नैराश्य, दु:ख आणि असंतोष दिसते आणि सकारात्मक विचारांनी आपल्याला कायम आशा, सुख आणि समाधानच दिसते.
आता आपण हे ठरवायचे आहे की, सकारात्मक चष्मा लावून जगाकडे पाहायचे की, नकारात्मक चष्म्याने पाहायचे. जर आपण सकारात्मकतेचा चष्मा लावला असेल तर आपल्याला प्रत्येक व्यक्ति चांगला वाटेल आणि जर नकारात्मक चष्मा लावला असेल तर आपल्याला सर्वत्र वाईटच दिसेल, आणि कालांतराने आपण तसेच बनू.
कसे बनाल सकारात्मक ?
सकारात्मकतेची सुरूवात आशा आणि विश्वासाने होत असते. कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास हा गमवायचा नाही आणि नेहमी आशावादी राहायचे. एका ठिकाणी चारही बाजूंनी अंधार असेल आणि काहीच दिसत नसेल तर त्याठिकाणी आपण एक लहानसा दिवा लावला तर त्या दिव्यामुळे एका क्षणात सर्वत्र पसरलेला अंधार दूर होईल. याचप्रकारे आशाचे किरण म्हणजेच सकारात्मक विचार सर्व नकारात्मक विचारांना एका क्षणात मिटवून टाकतात.
नकारात्मकतेला नकारात्मक नष्ट करु शकत नाही, नकारात्मकतेला केवळ सकारात्मकताच नष्ट करू शकते. यासाठी जेव्हाही नकारात्मक विचार मनात येईल, त्याचवेळी सकारात्मक विचारात त्याचे परिवर्तन व्हायला हवे.
सकारात्मक बनण्यासाठी काही टिप्स
* जीवनात नेहमी चांगलेच शोधा, न्युनगंड बाळगू नका. संकटांच्या बाबतीत विचार न करता आपल्यातील बलस्थानांच्या बाबतीत विचार करा, ज्यांच्या आधारे आपण त्या समस्या सोडवू शकू.
* दुसºयांजवळ काय आहे, याबाबत काळजी न करता आपल्याजवळ जे काही त्यात समाधानी रहा. हा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या जीवनातील नकारात्मता संपुष्टात आणेल.
* जे काम हाती घेतले आहे, ते पूर्ण करा. प्रत्येक काम अपूर्ण सोडले तर आपल्या जीवनात नकारात्मक विचार प्रवेश करतात.
* नेहमी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. जे पण काम आपल्या व्यवसायाशी संबंधीत आहे आणि आपल्याला ते काम येत नसेल तर ते नक्की शिका. असे केल्याने आपण आपल्या कामात परिपूर्ण बनाल आणि आपल्या जीवनात सकारात्मक उर्जा संचारेल.
* वेळोवेळी निस्वार्थ भावनेने परक्या व्यक्तिंची मदत करुन पहा. असे केल्याने आपला सामाजिक दृष्टिकोन वाढेल आणि आपल्याबरोबरच समाजात सकारात्मक उर्जेचा प्रवाह संचारेल.
* जे लोक नेहमी नकारात्मक विचार करतात किंवा नेहमी भांडणे, शंका करतात त्यांच्यापासून चार हात लांबच रहा.
* सकारात्मकता विचारसरणी बळावण्यासाठी नेहमी ध्यानधारणा करा आणि सकारात्मक विचार करणाºया व्यक्तिंच्या संपर्कात रहा.
* प्रत्येक दिवशी एक नवे ध्येय निश्चित करुन कामास सुरूवात करा आणि त्या ध्येयाला नक्की पूर्ण करा. असे केल्याने आपले जीवन सकारात्मकतेकडे वाटचाल करण्यास सुरुवात करेल.
ravindra.more@lokmat.com