ब्लीचिंग करताना आवर्जून 'या' गोष्टींची घ्या काळजी, नाही तर त्वचेसाठी पडेल महागात!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 11:26 AM2019-11-29T11:26:47+5:302019-11-29T11:31:30+5:30
चेहऱ्यावरील नको असलेले केस लपवण्यासाठी आणि लगेच ग्लोईंग स्किन मिळवण्यासाठी सर्वात चांगला पर्याय ब्लीच मानला जातो. ब्लीच करणं हा सोपा आणि फायदेशीर पर्याय मानला जातो.
(Image Credit : mostinside.com)
चेहऱ्यावरील नको असलेले केस लपवण्यासाठी आणि लगेच ग्लोईंग स्किन मिळवण्यासाठी सर्वात चांगला पर्याय ब्लीच मानला जातो. ब्लीच करणं हा सोपा आणि फायदेशीर पर्याय मानला जातो. त्यामुळेच महिला अनेकदा पार्लरऐवजी घरीच ब्लीच करणं पसंत करतात. तुम्हीही असंच करत असाल तर ब्लीच लावताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
योग्य ब्लीचची निवड
(Image Credit : urbanclap.com)
ब्लीच वेगवेगळ्या कंपनी आणि त्वचेच्या प्रकारानुसार उपलब्ध असतात. तुम्ही तुमच्या त्वचेसाठी योग्य ब्लीचची निवड करताना थोडं ब्लीच बोटाने कानाच्या मागच्या भागात लावा. याने जर तुम्हाला जळजळ होत असेल किंवा खाजवत असेल तर हे ब्लीच तुम्ही अजिबात वापरू नका. ज्यांची त्वचा अधिक संवेदनशील असते त्यांनी हे आवर्जून करावं.
ब्लीच लावण्याची पद्धत
(Image Credit : bebeautiful.in)
ब्लीचचा वापर करताना ब्लीच कधीच बोटाने चेहऱ्यावर लावू नये. ब्लीच लावण्यासाठी मुलायम ब्रशचा वापर करावा. याने तुमची नखे आणि हातही स्वच्छ राहतील आणि ब्रशने ब्लीच योग्यप्रकारे त्वचेवर लागेल. ब्लीच केवळ चेहऱ्यावरच नाही तर गळ्यावर आणि मानेवरही लावा. जेणेकरून त्वचेचा रंग एकसारखा दिसेल.
हे कराच
ब्लीच चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा फेसवॉशने चांगला स्वच्छ करा. प्री-ब्लीच क्रीम लावून हलक्या हाताने १० मिनिटांपर्यंत मसाज करा. जेव्हा त्वचा मुलायम आणि स्वच्छ होईल तेव्हा एका छोट्या वाटीमध्ये १ ते २ छोटे चमचे ब्लीचिंग क्रीम घ्या. यात १ ते २ थेंब एक्टिवेटर मिश्रित करा. एक्टिवेटर जास्त प्रमाणात असू नये. याने नुकसान होऊ शकतं.
किती मिनिटे ठेवावं
ब्लीच केवळ १० ते १५ मिनिटे चेहऱ्यावर ठेवल्यावर चेहरा पाण्याने धुवा. नंतर चेहरा मुलायम कॉटनने किंवा कापडाने स्वच्छ करा. त्यानंतर पोस्ट ब्लीच क्रीम चेहऱ्यावर, मानेवर लावा.