Raksha Bandhan 2019 : बाजारातील स्टॉल्सवर जाऊन मेहंदी लावताय?; 'या' गंभीर आजारांचा होऊ शकतो धोका!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 01:16 PM2019-08-13T13:16:35+5:302019-08-14T00:41:57+5:30
मार्केटमध्ये अनेक ठिकाणी मेहंदी काढून देणारे अनेक स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतात. अनेक महिलांची या स्टाल्सवर गर्दी पाहायला मिळते. तुम्हीही अशाच स्टॉल्सवरून मेहंदी काढून घेत असाल तर, वेळीच सावध व्हा.
रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. भावा-बहिणींच्या पवित्र नात्याचा हा सण संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. या दिवसासाठी भावांपेक्षा बहिणी फार उत्साही दिसतात. अनेक महिला खरेदी करण्यासाठी बाहेर पडतात. अशातच सर्वात जास्त क्रेझ पाहायला मिळते, ती मेहंदीची. मार्केटमध्ये अनेक ठिकाणी मेहंदी काढून देणारे अनेक स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतात. अनेक महिलांची या स्टाल्सवर गर्दी पाहायला मिळते. तुम्हीही अशाच स्टॉल्सवरून मेहंदी काढून घेत असाल तर, वेळीच सावध व्हा.
कारण मॉलमध्ये किंवा बाजारात असणाऱ्या स्टॉल्सवर मेहंदी काढणं तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या मेहंदीमध्ये अनेक केमिकल्स वापरण्यात येतात. ही केमिकल्स मेहंदीचा रंग खुलवण्यासाठी वापरली जातात. पण ही केमिकल्स त्वचेसाठी अत्यंत घातक ठरू शकतात.
कोणत्या केमिकल्सचा वापर करण्यात आलेला असतो?
बाजारात लावल्या जाणाऱ्या मेहंदीमध्ये पीपीडी आणि डायमीन नावाचे रसायन असतात जे त्वचेसाठी हानिकारक असतात. हे रसायन मेहंदीचा रंग डार्क करण्यासाठी वापरले जातात.या घातक रसायनामुळे त्वचेवर खाज येणे, जळजळ येणे आणि सूज येणे अशा समस्या होतात.
कॅन्सरही होऊ शकतो...
जेव्हा ही रसायन मिश्रित मेहंदी सूर्य किरणांच्या संपर्कात येते तेव्हा त्याने कॅन्सर होण्याची शक्यता असते. यात यात केवळ पीपीडीच नाही तर अमोनिया, आक्सीडेटिन, हायड्रोजनसारखे आणखीही काही घातक रसायन मिश्रित असतात. जे त्वचेसाठी फार हानिकारक ठरतात. मेहंदीमध्ये तयार होणारं पीएच अॅसिड सर्वात घातक असतं.
हर्बल मेहंदी सर्वात चांगली
गेल्याकाही काळापासून बाजारात मिळणाऱ्या मेहंदीला ओळखणं कठिण असतं. त्यामुळे प्रयत्न करा की, मेहंदीच्या पानांपासून तयार करण्यात आलेली मेहंदीच वापरा. हर्बल मेहंदी केवळ हाताची सुंदरताच वाढवत नाही तर त्वचेला थंडही करते. ही मेहंदी केसांना लावणेही फायदेशीर ठरते.
ही घ्या काळजी
हे ध्यानात ठेवा की, मेहंदी लावल्यानंतर तुमच्या शरीराच्या भागांवर काही इजा झाली किंवा आणखीही काही झालं तर हात लगेच थंड पाण्याने धुवा. त्यानंतर खोबऱ्याचा लेप त्यावर लावा आणि शरीराच्या त्या भागाची चांगल्याप्रकारे मालिश करा.
काय म्हणतात तज्ज्ञ?
डॉक्टरांनुसार, मेहंदी लावताना हे कळत नाही की, ती तुम्हाला किती नुकसान पोहोचवत आहे. पण याने होणाऱ्या नुकसानाबाबत तुम्हाला काही वेळाने कळेल. याने तुम्हाला कॅन्सरसारखा गंभीर आजारही होऊ शकतो.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.