वाढत्या वयातही तारूण्य टिकवण्यासाठी गुळाचा वापर करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 11:29 AM2018-07-24T11:29:48+5:302018-07-24T11:29:51+5:30
भारतीय कुटुंबांमध्ये जेवणानंतर गोड पदार्थ म्हणून गूळ खाण्याची पद्धत आहे. गुळामध्ये आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर तत्वे आढळून येतात. परंतु, शरीराव्यतिरिक्त गूळ स्कीन आणि केसांचे आरोग्य राखण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
भारतीय कुटुंबांमध्ये जेवणानंतर गोड पदार्थ म्हणून गूळ खाण्याची पद्धत आहे. गुळामध्ये आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर तत्वे आढळून येतात. परंतु, शरीराव्यतिरिक्त गूळ स्कीन आणि केसांचे आरोग्य राखण्यासाठी उत्तम पर्याय आहे. गुळामध्ये अनेक व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. जे स्कीन आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. चेहऱ्यावरील डाग, पुरळ यांसारख्या स्कीन प्रॉब्लेम्सपासून गुळाचा वापर करून सुटका करून घेऊ शकता. गुळामध्ये असलेलं आयर्न केसांना नैसर्गिक पद्धतीने सुंदर आणि घनदाट बनवण्यासाठी मदत करतात. जाणून घेऊयात गुळाचे स्कीन आणि केसांना होणारे फायदे...
1. चेहऱ्याला उजाळा देण्यासाठी
गुळामध्ये गलाईकोलिक अॅसिड असते. जे त्वचेवर असलेले बॅक्टेरिया कमी करण्याचं काम करतं. गुळामध्ये मध आणि लिंबू मिक्स करून एक फेस पॅक तयार करा. 10 मिनिटपर्यंत चेहऱ्यावर लावा आणि त्यानंतर चेहरा धुवून घ्या. आठवड्यातून 3 वेळा असे केल्यानं त्वचेच्या समस्या दूर होतील आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येईल.
2. पिंपल्स दूर करण्यासाठी
धूळ-माती आणि प्रदूषणामुळे चेहऱ्यावर पिम्पल्सची समस्या उद्भवते. यापासून सुटका करण्यासाठी दररोज थोडासा गूळ खा. गुळामध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. त्यामुळे गूळ खाल्याने स्कीन आतून स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच काही दिवसांत पिंपल्स आपोआप दूर होतात.
3. केसांमध्ये चमक आणण्यासाठी
केस गळणे, तुटण्याची समस्या असल्यास, केस पातळ झाले असतील किंवा केसांची चमक नाहिशी झाली असेल तर केसांसाठी गुळाचा वपर करा. थोडा गूळ घेऊन त्यामध्ये मुलतानी माती आणि दही मिक्स करून हेयर पॅक तयार करा. हा हेअर पॅक प्रत्येकवेळी केस धुण्याआधी केसांमध्ये अर्ध्या तासासाठी लावून ठेवा आणि नंतर केस धुवून टाका. केस धुण्यासाठी कमी केमिकल असलेला शॅम्पू वापरा. जास्त केमिकल असलेला शॅम्पू वापरल्याने गूळाचे सगळे गुणधर्म नष्ट होतील.
4. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी
प्रदूषण आणि स्कीनवर पाण्याच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या होऊ शकतात. स्कीन रूक्ष होऊ लागते आणि वेळेआधीच त्वचेवर वाढत्या वयाची लक्षणं दिसू लागतात. यावर उपाय म्हणून गुळाचा वापर करता येऊ शकतो. रोज गुळासोबत थोड्या तीळाचा वापर करा. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होईल.
5. डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी
डोळ्यांच्या खाली तयार होणारे डार्क सर्कल्स दूर करण्यासाठीही गूळाचा वापर होतो. गूळ थोडा बारिक करून त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करून पेस्ट तयार करा. याला दररोज 10 मिनिटांसाठी डोळ्यांखाली लावा. तसेच दररोज थोडा गूळ खा.