बर्फाचा एक तुकडा दूर करू शकतो उन्हाळ्यातील स्कीन टॅनिंगची समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 07:38 PM2019-04-26T19:38:48+5:302019-04-26T19:43:41+5:30
उन्हाळ्यामध्ये अनेकदा टॅन झालेल्या त्वचेचा सामना करावा लागतो. जर तुम्हीही टॅन झालेल्या त्वचेचा सामना करत असाल तर बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांपेक्षाही बर्फ फायदेशीर ठरतो.
उन्हाळ्यामध्ये अनेकदा टॅन झालेल्या त्वचेचा सामना करावा लागतो. जर तुम्हीही टॅन झालेल्या त्वचेचा सामना करत असाल तर बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांपेक्षाही बर्फ फायदेशीर ठरतो. महागड्या क्रिम्स किंवा महागड्या पार्लर ट्रिटमेंट्सऐवजी बर्फाच्या मदतीने टॅनिंगची समस्या दूर होऊ शकते. खरचं सांगतोय... अनेक ब्युटी प्रोडक्ट्स, फ्रूट स्क्रब, स्किन लोशन्सपेक्षाही जास्त परिणामकारक ठरतो बर्फ. जाणून घेऊया स्किन टॅन दूर करण्यासाठी बर्फाचा कसा वापर करावा त्याबाबत...
टॅनिंग दूर करतो बर्फ
उन्हाळ्यामध्ये घामासोबतच टॅनिंगची समस्येने अनेक लोक वैतागलेले असतात. सनस्क्रिन लोशन्स आणि ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करण्याऐवजी बर्फाचा वापर करा. हे त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.
(Image Cedit : Step To Health)
मसाज करा
एक बर्फाचा तुकडा घेऊन त्याच्या मदतीने चेहऱ्यावर मसाज करा. काही दिवसांपर्यंत हा उपाय ट्राय करा. त्यामुळे टॅनिंगपासून सुटका होण्यास मदत होते. चेहऱ्यावर टॅनिंग असेल तर एका सूती कपड्यामध्ये बर्फ घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे बर्फ हातामध्ये पकडताना त्रास होणार नाही आणि टॅनिंग दूर करण्यासही मदत होईल. शरीरावर कुठेही स्किन टॅन दिसत असेल तिथे बर्फ लावल्याने फायदा होतो.
त्वचा ऑयली राहणार नाही
बर्फ चेहऱ्याच्या त्वचेवर लावल्याने टॅनिंगची समस्या दूर होतेच आणि ऑयली स्किनपासूनही सुटका होते. उन्हाळ्यामध्ये टॅनिंगव्यतिरिक्त त्वचेवर धूळ, घाण चिटकल्यामुळे पिंपल्सची समस्या वाढते. यापासून बचाव करण्यासाठी बर्फाने चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे पिंपल्सची समस्या दूर होते. बर्फाने मसाज केल्याने त्वचेवरील ओपन पोर्सची समस्याही कमी होते.
उन्हामुळे येणाऱ्या घामोळ्या दूर करतात
सूर्याच्या प्रखर सुर्यकिरणांमुळे शरीरासोबतच चेहऱ्यावरही घामोळ्या येतात. ज्यांची त्वचा अत्यंत सेन्सेटिव्ह असते. त्यांना उन्हामध्ये राहिल्याने त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यापासून बचाव करण्यासाठी बर्फाने मसाज करणं फायदेशीर ठरतं.
डार्क सर्कल होतात दूर
पौष्टिक आहाराच्या कमतरतेमुळे तणाव, अनिद्रेचा त्रास इत्यादी कारणांमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात. लोकांचं जीवन एवढं धावपळीचं झालं आहे की, योग्य पद्धतीने शरीराला आरामही देत नाही. ज्यामुळे तणाव वाढतो. याचा थेट परिणाम डोळ्यांखाली येणाऱ्या डार्क सर्कल्सवर पडतो. बर्फाच्या तुकड्याने डार्क सर्कल्सवर हलक्या हाताने मसाज केल्याने यापासून सुटका होते.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.