उन्हाळयात घामोळ्यांपासून बचावासाठी खास टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 12:02 PM2019-03-30T12:02:56+5:302019-03-30T12:15:39+5:30
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता आणि सोबतच तीव्र ऊन यामुळे त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे लोक वेगवेगळे उपाय करतात.
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता आणि सोबतच तीव्र ऊन यामुळे त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे लोक वेगवेगळे उपाय करतात. उन्हाळ्यात सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते की त्वचेची आणि केसांची. उन्हाळ्यात घामामुळे घामोळ्या अनेकांना होतात. घामामुळे त्वचेवरील छिद्र बंद होतात वेळीच घामोळ्यांच्या त्रासाकडे लक्ष दिले नाही तर हिट स्ट्रोकचा त्रास वाढण्याची शक्यता असते. या समस्येमध्ये शरीराचे तापमान संतुलित राखणे कठीण होते. म्हणूनच हा एक्सपर्ट सल्ला नक्की लक्षात ठेवा.
घामोळ्यांचा त्रास टाळण्यासाठी काय?
काकडी
काकडीमुळे शरीर थंड राहतं. एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस टाका. यातच काकडीचे काही तुकडे कापून टाका. हे काकडीचे तुकडे घामोळ्यांवर लावा. याने तुम्हाला आराम मिळेल.
कैरी
कैरीनेही शरीराची गरम दूर करण्यास मदत मिळते. आधी कैरी हलक्या आसेवर भाजा. त्यानंतर त्यातील गर शरीरावर लावा. याने घामोळ्या दूर होतील.
तुळस
तुळशीची पाने किंवा फांदी बारीक करून त्याचं पावडर तयार करा. याची पेस्ट घामोळ्यांवर लावा.
१) उन्हाळ्याच्या दिवसात सैल आणि सुती कपड्यांचा वापर करा. प्रवास करताना ज्या कपड्यांमध्ये तुम्हांला कम्फर्टेबल वाटेल अशाच कपड्यांची निवड करा. घाम आल्यानंतर ताबडतोब कपडे बदला. उष्णतेमुळे त्वचेला रॅश येणे, घाम येणे हा त्रास हमखास वाढतो.
२) थेट उष्ण वातावरणात जाणं टाळा. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर कष्टदायक व्यायाम करणंही टाळा. यामुळे घाम येण्याचं प्रमाण वाढतं. तसेच घामोळ्यांचा त्रासही वाढू शकतो.
३) घराबाहेर पडण्यापूर्वी छातीजवळ, पाठीवर भरपूर घामोळ्यांपासून बचाव करणारी पावडर लावा. घामोळ्यांचा त्रास असलेला भाग थंड आणि शुष्क राहील याची काळजी घ्या.
४) तुम्हांला घामोळ्यांचा त्रास होत असेल तर त्यावर कोरफडीचा गर /लोशन किंवा बर्फ लावणंदेखील फायदेशीर ठरेल.
५) कॅलॅमाईन लोशन किंवा डॉक्टरांनी सुचवलेली सौम्य स्टिरॉईड क्रीम्स त्वचेला होणारी जळजळ किंवा खाज कमी करण्यास फायदेशीर ठरतात. पण ऑईल बेस्ड प्रोडक्ट्स वापरू नका. यामुळे खाज किंवा घाम अधिक वाढू शकते.
६) नियमित मुबलक पाणी पिण्याची सवय ठेवा. यामुळे तुम्ही हायड्रेटेड रहाल. पाण्यासोबतच ताज्या फळांचा रस, ग्लुकोज, व्हिटॅमिन सी युक्त ड्रिंक्स यांचा आहारात समावेश वाढवा. तसेच उन्हाळाचा त्रास टाळण्यासाठी कोल्ड ड्रिंक्स, कार्बोनेटेड बेव्हरेजेस पिणं टाळा. यामुळे डिहायड्रेशनचा त्रास वाढतो.