इव्हन टोनसोबतच, चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी 'हे' 3 घरगुती उपाय; एकदा वापरून पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 11:30 AM2019-09-14T11:30:11+5:302019-09-14T11:34:52+5:30
अनेकदा सतत उन्हाच्या संपर्कात आल्याने, वाढत्या वयामुळे आणि हार्मोनल बॅलेन्स बिघडल्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेचा रंग असमान दिसू लागतो.
अनेकदा सतत उन्हाच्या संपर्कात आल्याने, वाढत्या वयामुळे आणि हार्मोनल बॅलेन्स बिघडल्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेचा रंग असमान दिसू लागतो. अनेक महिला चेहऱ्याच्या त्वचेचा असमान दिसणारा रंग लपवण्यासाठी मेकअपचा आधार घेतात. तर अनेकजणी या समस्येपासून सुटका करण्यासाठी पार्लरमध्ये हजारो रूपये खर्च करून येतात.
अनेकदा असं होतं की, आपल्या त्वचेसाठी योग्य प्रोडक्ट न निवडल्यामुळे ही समस्या आणखी वाढते. जर तुम्हीही या समस्येमुळे हैराण असाल तर आज आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमची इव्हन स्किन टोन म्हणजेच, चेहऱ्यावरील असमान रंगाची त्वचा दूर करून समान रंगाची त्वचा मिळवू शकता.
जाणून घेऊया की, ही समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला नक्की काय करावं लागेल?
1. लिंबू, साखर आणि खोबऱ्याच्या तेलाचं स्क्रब
आपल्या त्वचेवर एकसमान रंग मिळवण्यासाठी तुम्हाला लिंबू, साखर आणि खोबऱ्याचं तेल हे घरात अगदी सहज उपलब्ध होणारे पदार्थ मदत करतील. त्यासाठी एक चमचा खोबऱ्याच्या तेलामध्ये एक चमचा साखर आणि अर्धा चमचा लिंबाचा रस एकत्र करा. आता या मिश्रणाने चेहऱ्यावर व्यवस्थित स्क्रब करा. 10 मिनिटांसाठी तसचं ठेवा. त्यानंर चेहऱ्यावर मसाज करत मिश्रण काढून टाका आणि चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका. हा उपाय चेहऱ्याच्या त्वचेचा रंग उजळवण्यासोबतच त्वचेवरील काळ्या डागांची समस्या दूर करण्यासाठीही मदत करेल.
2. दूध, बेसन आणि बेकिंग सोड्याचा पॅक
चेहऱ्यावरील त्वचेचा काळपटपणा दूर करण्यासाठी बकरीचं दूध, बेकिंग सोडा आणि बेसन हे पदार्थ मदत करतील. बकरीच्या दूधाऐवजी तुम्ही इतर ताजं दूध वापरू शकता. बकरीचं दूध त्वचेवरील डेड स्किन सेल्स दूर करतं. याचसोबत बेसन आणि बेकिंग सोडा एकत्र करून पेस्ट तयार करा. आता तयार पॅक चेहऱ्यावर 15 मिनिटांसाठी लावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाका.
3. टोमॅटो, लिंबाचा रस आणि मधाचा फेस पॅक
आयुर्वेदातही मध त्वचेसाठी फायदेशीर असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तर टोमॅटो चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी मदत करतो. हा पॅक तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये 1 चमचा टोमॅटोचा रस, एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून पॅख तयार करा. तयार पॅक 10 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. त्यानंतर पाण्याच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)