तजेलदार आणि मुलायम त्वचेसाठी उपयोगी ठरतील 'हे' फेसपॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 07:47 PM2019-01-02T19:47:16+5:302019-01-02T19:49:49+5:30
वातावरणातील बदल, धूळ आणि प्रदुषण यामुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच त्वचेच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं तर त्यांचं रूपांतर अनेक गंभीर समस्यांमध्ये होऊ शकतं.
वातावरणातील बदल, धूळ आणि प्रदुषण यामुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच त्वचेच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं तर त्यांचं रूपांतर अनेक गंभीर समस्यांमध्ये होऊ शकतं. परिणामी निस्तेज त्वचा, पिंपल्स, सुरकुत्या यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशातच या सर्व समस्या दूर करण्यासाठी बाजारातील केमिकलयुक्त उत्पादनांऐवजी घरगुती उपाय करणं कधीही चांगलं. अनेकदा बाजारातून आणलेल्या उत्पादनांमुळे अनेकदा त्वचेला आणखी नुकसान पोहोचण्याची शक्यता असते. जाणून घेऊया अशा काही फेसपॅकबाबत ज्यामुळे त्वचेच्या समस्या दूर करण्यासोबतच तुम्ही त्वचा तजेलदारही करू शकता.
उडदाची डाळ आणि गुलाबपाणी
एक चमचा उडदाची डाळ कच्च्या दुधामध्ये भिजवून ठेवा. त्यामध्ये थोडं गुलाबपाणी एकत्र करून पेस्ट चेहऱ्यावर लावा. थोडा वेळ चेहऱ्यावर ठेवल्यानंतर हलक्या हाताने मसाज करत पेस्ट काढून टाका. त्यानंतर पाण्याने चेहरा धुवून घ्या.
बेसन, मोहरीचं तेल आणि दूध
2 चमचे बेसन, 1 चमचा मोहरीचं तेल आणि थोडसं दूध एकत्र करून पेस्ट तयार करा. संपूर्ण शरीरावर तयार पेस्ट लावा. काही वेळ ठेवल्यानंतर पाण्याने धुवून टाका. त्वचा मुलायम होण्यास मदत होईल.
मसूरची डाळ आणि अंड्याचा पांढरा भाग
मसूरची डाळ वाटून त्याची पावडर तयार करा. 2 चमचे डाळीच्या पावडरमध्ये एका अंड्याचा पांढरा भाग एकत्र करून पेस्ट तयार करा. त्यामध्ये 2 थेंब लिंबाचा रस आणि एक मोठा चमचा कच्चं दूध एकत्र करून चेहऱ्यावर लावा. काही वेळ ठेवल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाका.
खरबुज आणि सिताफळ
खरबुज आणि सिताफळाच्या बीया सारख्या प्रमाणात घेऊन त्यांची पावडर तयार करा. त्यानंतर दूध एकत्र करून चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. काही दिवस असं केल्याने त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.
पिकलेलं केळं आणि मध
पिकलेलं केळं कुस्करून पेस्ट तयार करा. त्यानंतर मध आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब एकत्र करा. मिश्रण एकत्र केल्यानंतर चेहऱ्यावर लावून मसाज करा. 5 ते 6 मिनिटं ठेवल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. यामुळे चेहरा उजळण्यासोबतच सुरकुत्या दूर होण्यासही मदत होईल.
संत्र्याची साल आणि दूध
2 मोठे चमचे संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये थोडं कच्च दूध आणि गुलाबपाणी एकत्र करून घट्ट मिश्रण तयार करा. तयार मिश्रण चेहऱ्यावर लावून थोडा वेळासाठी तसंच ठेवा. त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.