केसगळती थांबवायची असेल तर रिकाम्यापोटी 'या' पदार्थाचं करा सेवन!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 03:17 PM2018-09-11T15:17:37+5:302018-09-11T15:17:40+5:30
रोज तुमचेही इतकेच केस गळत असतील तर हे टक्कल पडण्याचं सुरुवातीचं लक्षण आहे. पण आयुर्वेदात अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने केसगळती थांबवली जाऊ शकते.
केसगळतीच्या समस्येने अनेकांना ग्रासलं आहे. त्यामुळे केसगळती थांबवण्यासाठी हजारो रुपये खर्च केला जात आहे. फार कमी वयातच अनेकांना टक्कल पडतं. रोज ५० ते १०० केस गळून जातात. जर रोज तुमचेही इतकेच केस गळत असतील तर हे टक्कल पडण्याचं सुरुवातीचं लक्षण आहे. पण आयुर्वेदात अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने केसगळती थांबवली जाऊ शकते. चला जाणून घेऊया काही खास उपाय...
जवसाचे औषधी गुण अनेकांना माहीत असतील. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर जवसाच्या बिया तुमच्या केसांना मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यासोबतच याने तुमच्या डॅमेज झालेल्या केसांना मजबूत करण्यासाठी आणि हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतं. चला जाणून घेऊ कसा होतो याचा केसांना फायदा...
डाएटमध्ये असा करा समावेश
सर्वातआधी एक चमचा जवसाच्या बिया पॅनमध्ये टाका. त्यानंतर ते ५ मिनिटे चांगले भाजून घ्या. आता बिया मिक्सरमधून चांगल्या बारीक करा. हे पावडर रोज एक चमचा रिकाम्यापोटी सेवन करा. हे पावडर तुम्ही दह्यासोबतही सेवन करु शकता. काही दिवसांनी याचा फायदा तुम्हाला दिसेल.
असा करा केसांवर वापर
तुम्हाला हवं असेल तर केसांच्या मुळात जवसाच्या तेलाचा तुम्ही वापर करु शकता. याने तुमच्या केसांना पोषण मिळेल. हे तेल अनेकदा वापरल्यास केसांची गुणवत्ता सुधारते. त्यासोबतच केसगळती थांबते आणि केसात कोंडाही होत नाही.
(टिप : हा उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या, कारण याची कुणाला अॅलर्जी असेल तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.)