केसांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी 'या' तेलांचा वापर करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 15:05 IST2018-11-05T15:04:40+5:302018-11-05T15:05:00+5:30
केसांमध्ये कोंडा होणे ही एक साधारण समस्या आहे. वाढतं प्रदूषण, धूळ किंवा डोक्याची त्वचा कोरडी झाल्यामुळे केसांच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो.

केसांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी 'या' तेलांचा वापर करा!
केसांमध्ये कोंडा होणे ही एक साधारण समस्या आहे. वाढतं प्रदूषण, धूळ किंवा डोक्याची त्वचा कोरडी झाल्यामुळे केसांच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातीलच एक म्हणजे केसांमध्ये झालेला कोंडा. यामुळे केस शुष्क आणि निर्जीव होणं, डोक्यात खाज येणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. यापासून सुटका करून घेण्यासाठी लोक बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा आणि अॅन्टी-डॅन्ड्रफ शॅम्पूचा वापर करतात. परंतु हा शॅम्पू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल्स केसांच्या समस्या वाढवतात. जर तुम्ही कोंड्यामुळे होणाऱ्या केसांच्या समस्यांमुळे त्रस्त असाल तर आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही या समस्येपासून सुटका करून घेऊ शकता.
केसांमध्ये कोंडा झाला असेल आणि त्यामुळे तुम्हाला केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत असेल तर डोक्याच्या त्वचेला तेलाने मालिश करणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि केसांच्या समस्या दूर होतात. याव्यतिरिक्त तेलाने मालिश केल्यामुळे केसांना आवश्यक पोषक तत्व मिळतात. जाणून घेऊयात केसांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या केसांबाबत...
1. खोबऱ्याचे तेल
खोबऱ्याच्या तेलामध्ये अॅन्टी-बॅक्टेरिअल आणि अॅन्टी-फंगल गुणधर्म असतात. याचा वापर केल्याने केसांतील कोंडा दूर होण्यास मदत होते. त्यासाठी खोबऱ्याचं तेल कोमट गरम करून त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा. या तेलाने स्काल्पला 5 मिनिटांपर्यंत मसाज करा. त्यानंतर 45 मिनिटांनी केस धुवून टाका.
2. मोहरीचे तेल
मोहरीच्या तेलामध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असतात. केसांना या तेलाने मालिश केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळे केसांमध्ये होणाऱ्या कोंड्याच्या समस्येसोबतच इतर समस्या दूर होण्यास मदत होते. त्यासाठी 1 चमचा मोहरीचे तेल, 1 चमचा खोबऱ्याचे तेल आणि 1 चमचा कॅस्टर ऑइल मिक्स करून मिश्रण तयार करा. हलक्या हाताने केसांच्या मुळांना मसाज करा आणि 45 मिनिटांनी शॅम्पूने केस धुवून टाका. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय करून पाहा.
3. ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइलमध्ये केसांचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक असे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. तुम्हाला तुमच्या केसांच्या सर्व समस्या दूर करायच्या असतील तर एका बाउलमध्ये 2 चमचे ऑलिव्ह ऑइल आणि 1 चमचा हळद एकत्र करा. त्यानंतर हलक्या हातांनी केसांच्या मुळांना आणि केसांना मालिश करा. त्यानंतर एका तासाने शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून 2 ते 3 वेळा असं केल्याने केसांच्या सर्व समस्या दूर होतील.
4. तिळाचे तेल
केसांमध्ये झालेल्या कोंड्याच्या समस्येने वैतागला असाल तर तिळाचे तेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तिळाच्या तेलाने केसांच्या मुळाशी मालिश करा. साधरणतः एका तासाने कोमट पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय करा.
5. कडुलिंबाचे तेल
कडुलिंबामध्ये मोठ्या प्रमाणावर अॅन्टी-फंगल गुमधर्म असतात. ज्यामुळे केसांमध्ये झालेल्या कोंड्यापासून सुटका करून घेण्यास मदत होते. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 चमचा कडुलिंबाचे तेल आणि 1 चमचा खोबऱ्याचे तेल एकत्र करा. साधारणतः 5 मिनिटांपर्यंत केसांच्या मुळांजवळ मसाज करा. जवळपास अर्धा तासाने केस शॅम्पूने धुवून घ्या. असे आठवड्यातून 2 ते 3 वेळा असे करा.