Useful Tips: इस्त्री केलेल्या कपड्यांना सुरकुती पडू नये म्हणून सोपी ट्रिक वापरून बघा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 04:09 PM2024-05-20T16:09:57+5:302024-05-20T16:10:40+5:30
Useful Tips: इस्त्री केल्यानंतरही काही कपडे पटकन चुरघळतात, अशा वेळी कडक इस्त्री राहावी म्हणून फॉलो करा खालील टिप्स!
सुरकुतलेल्या कपड्यांचा प्रभाव पडत नाही. 'फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन' असे आपण म्हणतो. म्हणून इस्त्रीबंद कपडे घालणे पसंत करतो. मात्र कपडे अंगावर चढले की काही काळातच त्याची इस्त्री उतरते आणि ते चुरघळतात. अशा वेळी कोणत्या ट्रिक्स वापरता येतात ते पाहू.
कपडे धुताना घ्या काळजी :
कपडे नीट धुतले नाहीत तर सुकल्यानंतर खराब होतात. त्यानंतर कपडे कितीही चांगले इस्त्री केले तरी सुरकुत्या आणि डाग उठून दिसतात. कपड्यातील साबण धुतला जावा यासाठी किमान ३ वेळा पाण्याने कपडे धुवावेत. यानंतर तुम्ही ते व्यवस्थित पिळून पाणी काढून टाकावे. पाणी काढून टाकल्यानंतरकपडे झटकणे आवश्यक आहे. यामुळे सुरकुत्या दूर होतात आणि इस्त्री न करताही व्यवस्थित दिसतात.
जाड कपड्यांना इस्त्री
सॉफ्ट मटेरिअल असेल तर वरवर केलेली इस्त्री पुरते, पण कापड जेव्हा जाडसर असते, तेव्हा त्याची घडी छान बसावी म्हणून पाण्याचा हबका देत जोर लावून इस्त्री फिरवावी. त्यामुळे कपड्यांना दीर्घकाळ इस्त्री टिकून राहते.
सगळे कपडे एकाच वेळी इस्त्री करून ठेवू नका
अनेक लोकांना आठवडाभराचे कपडे इस्त्री करून ठेवायची असते. जबाबदाऱ्या आणि वेळेच्या अभावी हा निर्णय घेतला जातो, हे मान्य! परंतु, तसे केल्याने कपाटात कपड्यांची गर्दी होते आणि एक कपडा बाहेर काढताना बाकीचे चार कपडे बाहेर येतात आणि विस्कटतात. म्हणून शक्यतो एका वेळी एकच कपड्याला इस्त्री करा आणि शक्य नसेल तर दोन ते तीन कपडेच इस्त्री करून ठेवा, त्यापेक्षा अधिक नको! त्यामुळे कपड्यांना इस्त्री चांगली राहील आणि सुरकुत्या पडणार नाहीत.