हिवाळ्यात त्वचेसाठी वरदान ठरतात हे फ्रुट फेसपॅक; दूर होईल कोरड्या त्वचेची समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 01:55 PM2019-10-09T13:55:01+5:302019-10-09T13:55:48+5:30
हिवाळा सुरू होताच त्वचा निस्तेज, ड्राय होऊ लागते. अशातच थंडीमध्ये स्किन केअर रूटिन अत्यंत आवश्यक असतं. खासकरून त्या लोकांसाठी ज्यांची स्किन ड्राय असते.
हिवाळा सुरू होताच त्वचा निस्तेज, ड्राय होऊ लागते. अशातच थंडीमध्ये स्किन केअर रूटिन अत्यंत आवश्यक असतं. खासकरून त्या लोकांसाठी ज्यांची स्किन ड्राय असते. त्वचेमधील ओलावा कमी झाल्याने कोरड्या त्वचेची समस्या उद्भवते. त्यामुळे थंडीमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्हाला काही होममेड फेसपॅक मदत करतील. अनेकदा लोक थंडीमध्ये पेय पदार्थ, पाण्याचं सेवन कमी करतात. त्यामुळे त्वचेचं आरोग्य बिघडतं अशातच हे घरगुती फेसपॅक त्वचेचं कोरडेपणा दूर करण्यासोबतच त्वचेचं आरोग्य राखण्यासही मदत करतात.
जर तुमची त्वचा जास्तच कोरडी होत असेल तर तुम्हाला हिवाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात पाणी प्यावं लागेल. कोरड्या त्वचेमुळे खाज येणं, पांढरे डाग इत्यादी समस्या होऊ लागतात. थंडीमध्ये अशा समस्यांचा सामना करावा लागू नये असं वाटत असेल तर खाली देण्यात आलेले फेसपॅक तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. कोरड्या त्वचेपासून सुटका करण्यासाठी तसेच निस्तेज आणि काळवंडलेल्या त्वचेचीही समस्या दूर होईल.
काकडीचा फेसपॅक
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, काकडी पाण्याचा उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी याचा वापर अत्यंत फायदेशीर ठरतो. कोरड्या त्वचेची समस्या असणाऱ्या महिलांसाठी काकडीपासून तयार करण्यात आलेला फेसपॅक अत्यंत उपयुक्त ठरतो. यामुळे ड्रायस्किन मॉयश्चराइज्ड होते. काकडीचा रस त्वचेचा कोरडेपणा दूर करतो. तसेच यामध्ये कोरफडीचा गर एकत्र करून लावल्याने त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
असा तयार करा काकडीचा फेसपॅक
एक कप काकडीचा रस घ्या. यामध्ये दोन मोठे चमचे कोरफडीचा गर एकत्र करा. आता हा फेसपॅक चेहरा, हात आणि पायांवर व्यवस्थित लावा. 15 ते 20 मिनिटांसाठी तसचं ठेवा. आता चेहरा, हात-पाय पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्वचेवरील घाण दूर होईल तसेच कोरड्या त्वचेची समस्याही दूर होईल.
केळ्याचा फेसपॅक
केळ्यामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारे अनेक गुणधर्म असतात. तसेच केळी त्वचेसाठी आरोग्यदायी ठरतात. कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे, याणध्ये नैसर्गिक मॉयश्चरायझिंग तत्व असतात. यामध्ये तुम्ही ऑलिव्ह ऑइल आणि मध एकत्र करून फेसपॅक तयार केला तर त्वचेचा कोरडेपणा दूर होतो.
असा तयार करा केळ्याचा फेसपॅक
एक केळ घेऊन ते मिक्सरमध्ये बारिक करून त्याची पेस्ट तयार करा. त्यामध्ये एक चमचा मध आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करून चेहऱ्यावर व्यवस्थित अप्लाय करा. 15 ते 20 मिनिटं तसचं ठेवा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)