जिजाऊ मल्टीस्टेट घोटाळ्यात आरोपी न करण्यासाठी १ कोटींची लाच; एक अटकेत, पोलीस निरीक्षक फरार
By सोमनाथ खताळ | Published: May 15, 2024 10:35 PM2024-05-15T22:35:07+5:302024-05-15T22:36:45+5:30
पाच लाख रुपयांचा लाचेचा पहिला हप्ता घेताना एका खाजगी इसमास एसीबीने रंगेहाथ पकडले आहे, तर आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक, हवालदार फरार आहेत
बीड : येथील जिजाऊ मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरकडून एक कोटी रूपयांची लाच मागितली. त्यातील पहिला हप्ता पाच लाख रूपये खासगी व्यापाऱ्याकडे देण्यास सांगितले. लाच स्विकारताच व्यापाऱ्याला बेड्या ठोकल्या. तर लाच मागणारा आर्थिक गुन्हे शाखेचा पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे आणि प्रोत्साहन देणारा हवालदार हा फरार आहे. ही कारवाई बीडच्या एसीबीने बुधवारी सायंकाळी बीड शहरातील सुभाष रोडवर केली.याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती.
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे, हवालदार आर.बी.जाधवर आणि खासगी व्यापारी कौशल प्रवीण जैन (रा.बीड) अशी आरोपींची नावे आहेत. बीडमधील जिजाऊ मल्टीस्टेचा प्रमुख बबन शिंदे याने पांगरी राेडवर शाळा बांधली होती. त्याच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य तक्रारदाराने दिले होते. त्याचे पैसेही तक्रारदाराला शिंदे याने दिले. परंतू ठेविदारांनी गुन्हा दाखल केल्यानंतर याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे गेला. त्यात बँक स्टेटमेंटमधून पैसे तक्रारदाराच्या खात्यावर गेल्याचे दिसले. त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक खाडे यांनी दोघांना बोलावून घेतले.
तुम्हाला या गुन्ह्यात आरोपी करत नाही, त्याच्या बदल्यात प्रत्येकी ५० लाख रूपये असे १ कोटी रूपये लाचेची मागणी केली. चार महिन्यांपासून खाडे हे त्यांना त्रास देत होते. अखेर १३ मे रोजी रात्री उशिरा बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली. त्यानंतर १४ मे रोजी खात्री केली. १५ मे रोजी पैसे घेऊन तक्रारदार गेला. यावर खाडे याने आपण पुण्याला आलो असून जैन या व्यापाऱ्याकडे पैसे देण्यास सांगितले. जैनने पैसे स्विकारताच एसीबीने त्याला पकडले. त्यानंतर खाडे आणि हवालदार जाधवर यांचा शोध सुरू केला. परंतू रात्री उशिरापर्यंत ते मिळून आले नव्हते. ही कारवाई बीडचे उपअधीक्षक शंकर शिंदे, भारत गारदे, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, हनुमंत गोरे, सुरेश सांगळे, अंबादास पुरी आदींनी केली.