२२२ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार १ कोटी रूपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:43 PM2020-02-28T23:43:49+5:302020-02-28T23:45:56+5:30
बीड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ६५५ शेतकºयांची पहिली यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आधार प्रमाणिकरण करताना २६ शेतक-यांनी ...
बीड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ६५५ शेतकºयांची पहिली यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आधार प्रमाणिकरण करताना २६ शेतक-यांनी माहिती अमान्य केली. तक्रारीनुसार लवकरच निराकरण केले जाणार आहे. तर २२२ शेतक-यांच्या कर्जमाफीचे एक कोटी रुपये मंजूर झाले असून ही रक्कम संबंधित शेतक-यांच्या खात्यावर जमा होणार आहे. शुक्रवारी होऊ न शकलेली कर्जमाफीची दुसरी यादी शनिवारी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यात या योजनेंतर्गत ३ लाख ३ हजार ९२५ शेतकरी पात्र आहेत. २४ फेब्रुवारी रोजी नित्रुड व तेलगाव येथील ६५५ शेतकºयांची पहिली यादी प्रसिध्द झाल्यानंतर शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण करुन आधार क्रमांक, खाते क्रमांक, बॅँक, कर्ज रक्कम आदी माहितीची खात्री केली. दरम्यान शुक्रवारी दुस-या यादीची प्रतीक्षा होती. जिल्हा उपनिबंधकांसह यंत्रणेतील अधिकारी दिवसभर प्रतीक्षा करत होते. मात्र दुसरी यादी पोर्टलवर दिसून आली नसल्याचे सांगण्यात आले.
यादीत नाव असलेल्या शेतक-यांना आपले सरकार केंद्रात जावून खात्री करावयाची आहे. शासनामार्फत संबंधित केंद्रांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
२६ शेतक-यांच्या तक्रारी
२४ फेब्रुवारी रोजी पहिल्या यादीतील २६ शेतक-यांनी लॉगिन करून पोर्टलवरील खात्री करताना माहिती अमान्य असल्याचे म्हटले होते. पोर्टलवर याची तक्रार नोंद झाली. यातील २३ तक्रारी या आधार क्रमांकाबाबत आहेत. तर ३ तक्रारी या आधार क्रमांक व कर्ज रकमेबाबत असल्याचे जिल्हा उपनिबंधक शिवाजी बडे यांनी लोकमतला सांगितले.
जिल्हा समिती करणार निराकरण
प्राप्त झालेल्या २६ तक्रारींचे जिल्हा समिती निराकरण करणार आहे. जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात बॅँक अधिकारी तसेच इतर अधिका-यांच्या दररोज बैठक होऊन या तक्रारींची शहानिशा करुन निराकरण केले जाणार आहे.
यादी प्रसिद्धीनंतर प्रमाणीकरण करा
पात्र शेतक-यांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर बॅँका, चावडी, सोसायटीच्या ठिकाणी डकविल्या जाणार आहेत. त्यानुसार नाव वाचून आपले सरकार सेवा केंद्रात आधार कार्ड व बॅँक खात्याचे पासबुक घेऊन लॉगिन करुन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. संपूर्ण खात्रीनंतर माहिती मान्य असेल तर आधार प्रमाणिकरण नोंद झाल्याचे पत्र मिळणार आहे. आधार प्रमाणिकरण होताच चार- सहा दिवसात कर्जखात्यावर रक्कम जमा होणार आहे.