प्रशासनाला 10 दिवसांचा अल्टीमेट; दखल न घेतल्यास सामूहिक अन्नत्याग आंदोलन करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 22:13 IST2025-02-17T22:13:20+5:302025-02-17T22:13:43+5:30
संतोष देशमुख हत्या प्रकरण: मस्साजोगच्या ग्रामस्थांचा सरकारला थेट इशारा

प्रशासनाला 10 दिवसांचा अल्टीमेट; दखल न घेतल्यास सामूहिक अन्नत्याग आंदोलन करणार
केज(बीड)- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटले, पण अद्याप ठोस कारवाई झाली नाही. यामुळे आता मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपा आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय देशमुख यांच्या भेटीनंतर सर्वत्र उलट-सुलट चर्चेला उधाण आल्याच्या पार्शवभूमीवर सोमवारी(दि.17 फेब्रुवारी) रात्री 8 ते 9 या दरम्यान मस्साजोग येथील महादेव मंदिरासमोर गावाकऱ्यांची बैठक झाली.
सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून क्रूरपणे हत्या केली, त्याला 70 दिवस झाले तरीही कृष्णा आंधळे अद्याप फरारच आहे. याबद्दल सोमवारी रात्री मस्साजोग येथील महादेव मंदिरासमोर झालेल्या बैठकीत गावाकऱ्यांच्या बैठकीत प्रशासनावर नाराजीचा सूर उमटला. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गावकऱ्यांनी हल्ला चढवीला. प्रशासनाला 10 दिवसाचा अल्टीमेट देण्याचे यावेळी सर्वानुमते ठरविण्यात आले. त्यानंतर गावाकऱ्यांनी सामूहिक अन्न त्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, मुख्यमंत्री व राज्यपाल यांना निवेदन देण्याचेही बैठकीत ठरले
बैठकीतील मागण्या.
-गावाकऱ्यांच्या बैठकीत केजचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना बडतर्फ करुन त्यांना सह आरोपी करण्यात यावे.
-70 दिवसापासून फरार आसलेल्या कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करावी.
-हे प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावे व सरकारी वकील म्हणून अॅड उज्वल निकम यांची नियुक्ती करावी.
-आरोपीना पळून जाण्यासाठी व इतर प्रकारची मदत करणाऱ्या सर्व आरोपीचे सीडीआर काढून त्यांनाही याप्रकरणात सह आरोपी करण्यात यावे.
-अवादा एनर्जी कंपनीने याप्रकारणी आपली भूमिका स्पष्ट करावी, वाशी येथील पोलीस निरीक्षक व पोलिसांचे सीडीआर काढून दोषींना सह आरोपी करावे.
या सर्व मागण्या मान्य करण्यापूर्वी मस्साजोग येथे एक दिवशीय लक्षणिक उपोषण करण्यात यावे व यावेळी प्रशासनाचे अधिकारी आल्यानंतर त्यांच्या समोर या सर्व मागण्या मांडण्याचा निर्णय झाला. तसेच, शेवटी गावाकऱ्यांनी सामूहिक अन्न त्याग आंदोलन करण्याच्या निर्णयाला सर्वांनी हात उंचावून सहमती दर्शविली.
खा. सुप्रिया सुळे मस्साजोगला येणार
खासदार सुप्रिया सुळे मंगळवारी सकाळी 9 वाजता मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी येणार आहेत. आपल्याला फक्त न्याय पाहिजे. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत आपल्यात गैरसमज होऊ देऊ नका. अशी कळकळीची विनंती धनंजय देशमुख यांनी या बैठकीत बोलतांना केली.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा तपास
राज्यात अनेक मोठ-मोठ्या घटना घडल्या परंतु सीआयडी, एसआयटी, न्यायालयीन चौकशी आणि सीबीआय चौकशी अशा प्रकारचा तपास कोणत्याही घटनेत करण्यात आलेला नाही. याची आठवण करुन देतानाच सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या प्रकारणाचा तपास योग्य दिशेने चालू असल्याचे सांगितले. तसेच, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होईल, एवढे सर्व पुरावे तपास यंत्रणेकडे उपलब्ध आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल, अशी भूमिका धनंजय देशमुख यांनी या बैठकीत मांडली.