हुंड्यासाठी पत्नीचा खून करणाऱ्या पतीस १० वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 06:41 PM2019-05-09T18:41:12+5:302019-05-09T18:41:44+5:30
बीड तालुक्यातील पिंपरगव्हाण येथे एप्रिल २०१७ मध्ये ही घटना घडली होती.
बीड : हुंड्यासाठी पत्नीचा छळ करीत तिचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पतीस १० वर्षांचा सश्रम कारावास व सासू सासऱ्यास दोन वर्षांची शिक्षा सुनावली. हा निकाल बीडच्या सत्र न्यायालयाने गुरुवारी दिला. बीड तालुक्यातील पिंपरगव्हाण येथे एप्रिल २०१७ मध्ये ही घटना घडली होती.
छाया गोरख आगम (रा. पिंपरगव्हाण) असे मयताचे नाव होते. ३ एप्रिल २०१७ रोजी छाया घरात एकटीच होती. रात्रीच्या सुमारास पतीने जमिनी व वडिलांच्या नावावरील प्लॉट माझ्या नावावर करुन दे असे म्हणत तिला मारहाण केली. त्यानंतर तिचा गळा दाबून खून केला. तसेच सासरा दादासाहेब व सासू रामकंवर यांनीही तिचा छळ केल्याची फिर्याद छायाचे वडील दिनकर मनोहर घोलप यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती.
ग्रामीण ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक जी. एन. पठाण यांनी तपास करुन दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. सत्र न्या. क्रमांक ३ यु. टी. पौळ यांनी सदर प्रकरणात पुरावे व जबाब ग्राह्य धरुन आरोपी पती गोरख यास कलम ३०४ ब भादंवि मध्ये दोषी धरुन १० वर्षे सश्रम कारावास व हजार रुपये दंड तसेच सासू रामकंवर व सासरा दादासाहेब यांना छळ केल्याप्रकरणी कलम ४९८ अ अंतर्गत दोन वर्षे शिक्षा आणि प्रत्येकी हजार रुपये दंड ठोठावला. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. मंजुषा एम. दराडे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून ठाकूर यांनी सहकार्य केले.
वडील व मित्राचा जबाब ठरला महत्त्वपूर्ण
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये छायाचे वडील दिनकर घोलप व लग्न जमवताना बैठकीत असणारा त्यांच्या मित्राचा जबाब महत्त्वपूर्ण ठरला. बैठकीत तीन लोक होते. पैकी दोघांचा जबाब घेतला. यात एक फितूर झाला होता.