सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणास १०० दिवस पूर्ण, कृष्णा आंधळेला कधी पकडणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 15:43 IST2025-03-21T15:41:42+5:302025-03-21T15:43:10+5:30
पोलिसांसह सीआयडीचे अपयश उघड

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणास १०० दिवस पूर्ण, कृष्णा आंधळेला कधी पकडणार?
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. घटनेला १०० दिवस उलटूनही आरोपी अटक नसल्याने पोलिसांसह सीआयडीचे अपयश उघड झाले आहे. त्याच्या अटकेबाबत केवळ शोध सुरू असल्याचे सांगून माध्यमांना बोलणे टाळले जात आहे.
९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या झाली होती. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड, त्याचा मावस भाऊ विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसह आठ जण आरोपी होते. सीआयडीने तपास करून ८० दिवसांत १ हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यानंतर यात जोडलेले देशमुखांना मारहाण करणारे कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला होता. याच प्रकरणातील आठवा आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही सीआयडीला सापडलेला नाही. त्याच्या अटकेची मागणी देशमुख कुटुंबासह अनेकांनी केली.
धनंजय मुंडेंचा राजीनामा
या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याचा सहभाग आढळला. त्यानंतर विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी मुंडे यांच्यावर टीका करण्यासह राजीनामा देण्याची मागणी केली होती; परंतु तरीही राजीनामा झाला नव्हता. अखेर देशमुख यांना मारहाणीचे काही फोटो व्हायरल झाले आणि त्यानंतर राज्यभरात पडसाद उमटले. मग मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला होता.
बीडच्या न्यायालयात चालणार खटला
बीडच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले असले तरी हा खटला केज न्यायालयात चालवला जात होता; परंतु सीआयडीने आरोपींची सुरक्षा आणि ने-आणचे कारण देत बीडमध्येच हा खटला चालवावा, असा अर्ज केला होता. त्याला बुधवारी मान्यता मिळाली. त्यामुळे हा खटला बीडमध्ये चालणार असून २६ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
उज्ज्वल निकम येणार का?
या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली होती; परंतु अद्यापही ते बीडमध्ये आलेले नाहीत. आता २६ मार्च रोजी ते बीडला येतील, अशी शक्यता सहायक सरकारी वकील ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी व्यक्त केली.