१०० रूपयांच्या बनावट नोटा चलनात; परळी, अंबाजोगाईतील चौघांना बार्शी पोलिसांनी उचलले
By सोमनाथ खताळ | Published: July 20, 2023 07:51 PM2023-07-20T19:51:18+5:302023-07-20T19:51:30+5:30
पोलिसांनी बार्शीमध्ये १०० रूपयांच्या बनावट नोटा चालवताना दोघांना रंगेहाथ पकडले
परळी : १०० रूपयांच्या बनावट नोटा चलणात आणताना परळी व अंबाजोगाई येथील दोघांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यांचे इतर दोन साथीदारांनाही परळीतून गुरूवारी पहाटे बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही कारवाई बार्शी (जि.सोलापूर) पोलिसांनी केली.
सुनिल चंद्रसेन कोथींबिरे (वय २३ रा.पिंपळगाव नकले ता.माजलगाव ह.मु.माळीनगर अंबाजोगाई) व आदित्य धनंजय सातभाई (रा.तडोळी ता.परळी, ह.मु.स्टेशन लाईन गांधी मार्केट परळी) या दोघांना बार्शी शहरातील एका व्यापाऱ्यास बोगस नोटा देण्याचा प्रयत्न केला. ही माहिती बार्शी शहर पोलिसांना लागताच त्यांनी सापळा रचून या दाेघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता दोघांकडे १०० रूपयांच्या २० बनावट नोटा आढळून आल्या. त्यांच्याविरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर तेथील एक पथक अंबाजोगाई व परळीला आले.
गुरूवारी पहाटेच त्यांनी पकडलेल्या दोघांचे साथीदार खदील जमाल शेख (रा.मिरवट ता.परळी) व विजय सुधाकर वाघमारे (रा.गांधी मार्केट, परळी) या दोघांनाही बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून एक कार, ५० व १०० रूपयांच्या १० हजार ५०० रूपयांच्या बनावट नोटाही जप्त केल्या आहेत. बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ज्ञानेश्वर उदार, परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक लहू घरत यांनी ही कारवाई केली.