१० हजार घरकुल मंजूर झाले, त्यासाठी निधी कधी देणार?, धनगर नेते भारत सोन्नर यांचा सवाल
By सोमनाथ खताळ | Published: February 26, 2024 10:23 PM2024-02-26T22:23:37+5:302024-02-26T22:24:43+5:30
सरकारच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना व यशवंतराव होळकर घरकुल योजना लागू करण्यात आली होती.
सोमनाथ खताळ, बीड: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना व यशवंतराव होळकर घरकुल योजना याच्या माध्यमातून जिल्ह्यात १० हजार लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आलेले आहेत. परंतू यासाठी निधी कधी देणार? असा सवाल यशवंत सेना धनगर समाजाचे नेते भारत सोन्नर यांनी उपस्थित केला आहे. आचारसंहितापूर्वीहे यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही सोन्नर यांनी केली असून असे न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
सरकारच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना व यशवंतराव होळकर घरकुल योजना लागू करण्यात आली होती. त्याआनुषंगाने बीड जिल्ह्यातील गाव, वाड्यावस्त्यावरील वंचित असणाऱ्या लाभार्थ्यांनी सदरील घरकुल योजनेचा प्रस्ताव पंचायत समितीच्या मार्फत मागास बहुजन कल्याण विभाग बीड येथे भटक्या जमाती व धनगर समाज यांच्यावतीने प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. जिल्हाधिकारी व सहाय्यक समाजकल्याण आयुक्त बीड यांच्या बैठकीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत २ हजार ५१९ तर यशवंतराव होळकर घरकुल योजनेंतर्गत ६ हजार ४३४ लाभार्थ्यांची निवड करून त्यांना घरकूल मंजूर झाले आहेत.
यासाठी आणखीही हजारो लाभार्थी प्रस्ताव दाखल करणार आहेत. परंतू ज्यांना घरकूल मंजूर झाले आहेत, त्यांच्यासाठी मंत्री अतूर सावे यांनी आचारसंहितापूर्वीच निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भारत सोन्नर यांनी केली आहे. असे न झाल्यास यशवंत सेना धनगर समाजाच्यावतीने संभाजीनगर येथील मंत्री सावे यांच्या निवास्थानाबाहेर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सोन्नर यांनी पत्रकाच्या माध्यमातून दिला आहे.