माजलगाव धरणाची ११ दरवाजे उघडले; सांडस चिंचोलीला पुराच्या पाण्याचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 14:37 IST2020-09-18T14:30:07+5:302020-09-18T14:37:16+5:30
माजलगाव तालुक्यातील २७ गावांना अतिसतर्कतेचा इशारा

माजलगाव धरणाची ११ दरवाजे उघडले; सांडस चिंचोलीला पुराच्या पाण्याचा वेढा
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव : पैठण येथील जायकवाडी व माजलगाव येथील माजलगाव धरण पुर्ण क्षमतेने भरले असुन या दोन्ही धरणातुन मोठा विसर्ग होत आहे. यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी वाढून सांडस चिंचोलीला पाण्याचा वेढा पडला आहे. मागील ३० वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या २७ गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने ग्रामस्थांची झोप उडाली आहे.
माजलगाव धरणाच्यावरील भागात गुरुवारी संध्याकाळी जोरदार पाऊस पडल्याने शुक्रवारी पहाटे ११ दरवाजे १ मीटरने उचलून ४२ हजार ९०७ क्युसेक एवढा विसर्ग सिंदफना नदीपात्रात सोडण्यात आला. तर जायकवाडी धरणाच्या १८ दरवाज्यातून ७५ हजार क्युसेक पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले. या दोन्ही नदयांचा संगम मंजरथ येथे होत असल्याने त्याखालील गावांना मोठा धोका असतो.
गोदावरी दुथडी भरून वाहत असल्यामुळे सांडसचिंचोलीला पहाटेपासून पाण्याचा वेढा पडल्याने गावचा संपर्क तुटला आहे. तसेच गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे. मंदिराचे केवळ शिखर दिसुन येत आहे.
७५ हजार क्यूसेक विसर्गाने गोदावरीला महापूर https://t.co/xF7JT4a3iB
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 18, 2020