जिल्ह्यात होणार नवीन ११ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:32 AM2021-05-01T04:32:40+5:302021-05-01T04:32:40+5:30
बीड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळेच आता आरोग्य व्यवस्था ऑक्सिजनच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्याचे प्रयत्न ...
बीड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळेच आता आरोग्य व्यवस्था ऑक्सिजनच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून बीड जिल्ह्यात नवीन ११ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या कार्याचे आदेशदेखील देण्यात आले असून, दोन महिन्यांत यातून प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मिती सुरू होईल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण राज्यात ऑक्सिजनचा प्रश्न गंभीर झाला आहे. तशीच परिस्थिती बीड जिल्ह्यात ऑक्सिजनच्या बाबतीत आहे. या आठवड्यात जिल्ह्याचा ऑक्सिजन पुरवठा काहीसा सुरळीत झाला असला तरी, ऑक्सिजनची जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर धावाधाव करावी लागली. त्यामुळे शासनाने आरोग्य विभागाच्या संस्था ऑक्सिजन निर्भर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार स्थानिक आवश्यकतेनुसार शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी मंजुरी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
बीड जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय स्तरावर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याची मागणी आ. संदीप क्षीरसागर, आ. संजय दौंड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, माजी आ. अमरसिंह पंडित आदींनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. त्यानुसार धनंजय मुंडे यांनी आरोग्य विभागाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याला आता वेग आला असून, बीड जिल्ह्यात ११ नवीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिली.
याठिकाणी होणार ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प
बीड जिल्हा रुग्णालय २, स्वराती रुग्णालय २, लोखंडी सावरगाव रुग्णालय २ आणि परळी, केज, आष्टी, गेवराई, माजलगाव येथील उपजिल्हा रुग्णालय प्रत्येकी १ असे ११ ऑक्सिजन प्रकल्प उभारले जाणार आहेत. यातील प्रत्येक प्रकल्पाची क्षमता दिवसाला १७५ जम्बो सिलिंडर भरण्याची असणार आहे. सामान्य रुग्णाला १ जम्बो सिलिंडर १ दिवस पुरू शकतो. या प्रकल्पांना मंजुरी देऊन कार्यारंभ आदेशदेखील देण्यात आले असून येत्या दोन महिन्यांत कामे पूर्ण होऊन प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मिती सुरू होणार असल्याची अपेक्षा जिल्हाधिकारी जगताप यांनी व्यक्त केली आहे.
===Photopath===
300421\30_2_bed_17_30042021_14.jpg
===Caption===
ऑक्सिजन प्लान्ट