११४ कोटींची पाणीपुरवठा योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:20 AM2021-02-05T08:20:55+5:302021-02-05T08:20:55+5:30

बीड : शहरात ११४ कोटी ६३ लाखांची अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. महाराष्ट्र जीवन ...

114 crore water supply scheme stalled | ११४ कोटींची पाणीपुरवठा योजना रखडली

११४ कोटींची पाणीपुरवठा योजना रखडली

Next

बीड : शहरात ११४ कोटी ६३ लाखांची अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कंत्राटदाराशी संगनमत असल्याने झालेले कामही निकृष्ट असल्याचे सांगण्यात आले. याचा फटका सामान्य बीडकरांना सहन करावा लागत असून, तीव्र संताप व्यक्त होत आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानाची अंमलबजावणी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वत्र करण्यात आली. बीडमध्ये ११४ कोटी ६३ लाखांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. याचा कार्यारंभ आदेश १९ नोव्हेंंबर २०१७ ला लातूरच्या कंत्राटदाराला देण्यात आला. आदेश दिल्यापासून हे काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु तीन वर्षे उलटूनही अद्याप या योजनेचे काम पूर्ण झालेेले नाही. ज्या ठिकाणी काम झाले, तेथेही निकृष्ट काम झाल्याच्या तक्रारी शहरवासीयांनी नगरपालिकेकडे केल्या आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. कंत्राटदाराने अधिकाऱ्यांना हाताशी धरून या योजनेच्या कामात हलगर्जी केल्याचा आरोप होत आहे.

६० किमीचे काम अद्यापही अपूर्णच

ही पाणी पुरवठा योजना २४० किलो मीटरची आहे; परंतु एवढ्या वर्षात आतापर्यंत केवळ १८० किमीचे काम पूर्ण झाल्याचा दावा मजीप्रा करीत आहे. अद्यापही ६० किमीचे काम अपूर्णच आहे. त्यातही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितल्या जात आहेत. यावरून मजीप्राच्या कामातील गती दिसून येते. याकडे लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.

नगराध्यक्षांनी घेतली बैठक

या योजनेच्या अनुषंगाने नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मजीप्रा, पाणी पुरवठा विभाग यांची बैठक घेतली. यात पाण्याची टाकी व इतर सर्व कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या, तसेच धरण क्षेत्रातील पाइपलाइनची कामे उसतोडणी झाल्यास तत्काळ पूर्ण करण्यासही सांगितले. रस्ता दुरुस्तीची कामे शहरातील कोणत्या भागात झाली, याचा लेखी स्वरूपात देण्यासह डॉ. क्षीरसागर यांनी मजीप्राला सांगितले. यावेळी पाणी पुरवठा अभियंता राहुल टाळके, सभापती, मजीप्रा अधिकारी यांची उपस्थिती होती.

पाण्यासाठी बीडकरांची ओरड

मागील तीन वर्षांपासून अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू असूनही अद्याप ते अपूर्णच आहे. त्यामुळे शहरात आजही ८ ते १० दिवसाला पाणी येते. धरणात पाणी असतानाही केवळ जलवाहिणी व्यवस्थित नसल्याने आणि योजना अपूर्ण असल्याने बीडकरांमधून पाण्यासाठी ओरड होत आहे.

कोट

तांत्रिक बदल आणि शेतकऱ्यांचे काही प्रश्न असल्याने उशीर झाला. एका ठिकाणी पाण्याच्या टाकीचा प्रश्नही होता. आता जागा बदलल्याने डिझाईन बदलावी लागली. त्यामुळे उशीर होत आहे. ही योजना २४० किमीची असून, १८० किमीचे काम पूर्ण झाले आहे.

गौरव चक्के

कार्यकारी अभियंता, मजीप्रा बीड.

Web Title: 114 crore water supply scheme stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.