बीड जिल्हा रुग्णालयाला मिळणार १२ मल्टीपॅरा मॉनिटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:51 AM2018-10-27T00:51:08+5:302018-10-27T00:51:40+5:30
राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या माध्यमातून येथील जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागासाठी १२ मल्टीपॅरा मॉनिटर लवकरच उपलब्ध होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या माध्यमातून येथील जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागासाठी १२ मल्टीपॅरा मॉनिटर लवकरच उपलब्ध होणार आहेत.
शासकीय संस्था जर चांगल्या पद्धतीने काम करत असतील तर लोकसहभागही वाढत जातो. मागील एक वर्षापासून बीडचे जिल्हा रुग्णालय कात टाकत आहे. येथे रुग्णांना पुरेशी वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून आवश्यक सुविधा शासनपातळीवर आणि लोकसहभागातून उपलब्ध केल्या जात आहेत. जिल्हा रुग्णालयातील आयसीयू कक्ष अद्ययावत करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात प्रयत्नशील आहेत. चर्चेनंतर सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड यांनी स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने अवघ्या काही दिवसातच नवरात्रमध्ये जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागात १२ बेड उपलब्ध केले.
शुक्रवारी परळीत वैद्यनाथ देवस्थानच्या डायलेसिस सेंटरमध्ये जर्मन तंत्रज्ञानाची मेडिकल केअर मशीन राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी उपलब्ध करुन दिली. मशीन लोकार्पण कार्यक्रमात डिगे यांच्यासह जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी राज्य धर्मादाय आयुक्त डिगे यांच्याशी चर्चा केली. तसेच भाषणात बीड जिल्हा रुग्णालयातील कामांची व आरोग्य सेवा सुविधांची माहिती देत डॉ. थोरात यांनी जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागासाठी मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा केली. हाच धागा पकडून आयुक्त डिगे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सविस्तर चर्चेअंती डिगे यांनी मदतीची ग्वाही दिली. १२ मल्टीपॅरा मॉनिटर देण्याचे सूचक संकेत दिले. राज्य धर्मादाय आयुक्तांच्या पुढाकारातून धर्मादाय संस्थांच्या मदतीने बीड जिल्ह्यात दोन सामूहिक विवाह सोहळे पार पडले तसेच गणेश मंडळ व संस्थाच्या माध्यमातून सामाजिक आधाराचे मोठे काम झालेले आहे. बीडसाठी त्यांची मदत मोलाची ठरणार आहे.