केज तालुक्यातील १२ शाळा सुरू, मात्र विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:21 AM2021-07-22T04:21:49+5:302021-07-22T04:21:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क केज : राज्य शासनाने कोविड नसलेल्या ठिकाणी शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर केज तालुक्यातील बारा शाळा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : राज्य शासनाने कोविड नसलेल्या ठिकाणी शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर केज तालुक्यातील बारा शाळा सुरू झल्या आहेत. तालुक्यातील चिंचोलीमाळी येथे जि. प. प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली; मात्र तेथे कोविड रुग्ण सापडल्यामुळे पुन्हा बंद करण्यात आली. त्यामुळे तालुक्यात सध्या अकरा ठिकाणी शाळा सुरू केल्या आहेत. या शाळेत २५० विद्यार्थ्यांनी हजेरी लावली असल्याची माहिती केजचे गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांनी दिली.
जिथे कोविडचे रुग्ण नाहीत, अशा ठिकाणच्या शाळा सुरू करण्याबाबत व कोविडचे सर्व नियम अटींचे पालन करूनच शाळा सुरू करण्याबाबत निर्देश देण्यात आले असल्याने शासनाच्या आदेशानुसार केज तालुक्यात पहिल्यादिवशी १२ ठिकाणच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. चिंचोलीमाळी, येथील जि. प. प्राथमिक शाळा, नाव्होली येथील माध्यमिक शाळा, आवसगाव, तरनळीसह बारा ठिकाणच्या शाळा सुरू करण्याबाबत ग्रामपंचायतीने ठराव देऊन पालकांनीदेखील संमती दिली होती. या शाळांमध्ये जवळपास दोनशे पन्नास विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. शाळेच्या पहिल्या सत्रात दहा-पंधरा विद्यार्थी उपस्थित राहतात. त्यांना शाळेत मुख्य विषय शिकविले जात आहेत.
शाळा सुरू, पुन्हा बंद
तालुक्यातील ज्या ठिकाणी शाळा सुरू करावयाच्या आहेत, तेथे किमान एक महिन्यापूर्वी रुग्ण नसला पाहिजे. तसेच तेथील शाळेच्या शिक्षकांची ॲन्टिजन, तपासणी व आरटीपीसीआर तपासणी करणे आवश्यक व बंधनकारक कलेले आहे, ज्या ठिकाणी या सर्व बाबींची पूर्तता केलेल्या ठिकाणच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु चिंचोलीमाळी येथे कोविडचा रुग्ण निघाल्यामुळे तेथील शाळा पुन्हा बंद करण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी केंद्रे यांनी दिली.
शाळेला विद्यार्थ्यांची दांडी
तालुक्यातील अकरा शाळा चालू करण्यात आल्या असताना शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य आहे .अनेक पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास इच्छुक नसल्याचे चित्र दिसून येत आहे, तर विद्यार्थ्यांनाही आपले सवंगडी शाळेत येत नसल्याने शाळेत जाण्यास रस नसल्याने अनेक विद्यार्थी शाळेस दांडी मारत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.