अंबाजोगाईत पुलावरून दुचाकी पडल्याने बारावीचा विद्यार्थी ठार; एकजण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 01:24 PM2018-03-21T13:24:14+5:302018-03-21T13:24:14+5:30
लातूर - अंबाजोगाई रोडवरील वाघाळा पाटीजवळ सध्या काम सुरु असलेल्या पुलात मोटारसायकल कोसळून एक महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी आहे
अंबाजोगाई ( बीड ) : लातूर - अंबाजोगाई रोडवरील वाघाळा पाटीजवळ सध्या काम सुरु असलेल्या पुलात मोटारसायकल कोसळून एक महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी आहे. हा अपघात मंगळवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास झाला.
याबाबत प्राप्त माहिती अशी कि, नुकतीच अकरावीची परीक्षा देऊन बारावीच्या वर्गात गेलेले पवन मुंजाजी कनले (वय १७, रा. सोन्ना, जि. परभणी) आणि ऋषिकेश लक्ष्मण गडदे (वय १७, रा. बोधेगाव, ता. अंबाजोगाई) हे दोन महाविद्यालयीन विद्यार्थी रात्री उशीरापर्यंत शहरातील एका अभ्यासिकेत बसून होते. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ते तिथून निघून गेले असे समजते. त्यानंतर रात्रीतून ते बाईकवरून जात असताना वाघाळा जवळ सध्या काम सुरु असलेल्या पुलात कोसळली. या अपघातात पवन याचा जागीच मृत्यू झाला तर ऋषिकेश हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रस्त्याच्या खूप खाली दोन्ही युवक पडलेले असल्याने त्यांच्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. पहाटेच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या काही जागरूक नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेला बोलावून घेऊन जखमी ऋषिकेशला रुग्णालयात हलविले. दरम्यान, हे दोन्ही विद्यार्थी अंबाजोगाई - लातुर रोडवर कशासाठी गेले होते याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मयत पवन कनले याचे वडील परभणी जिल्ह्यात महसूल विभागात कर्मचारी असल्याचे समजते.