मेहुणीवर अत्याचार प्रकरणी १२ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:54 PM2018-06-18T23:54:06+5:302018-06-18T23:54:06+5:30
बीड : अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी लक्ष्मण सुदाम तोगे (रा. मुंडेवाडी, ता. केज) यास दोषी ठरवून १२ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्या. प्राची कुलकर्णी यांनी १८ जून रोजी सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. भागवत एस. राख यांनी काम पाहिले.
५ सप्टेंबर २०१७ रोजी बीड तालुक्यातील तांदळ्याची वाडी येथील अल्पवयीन मेहुणीला तुझ्या आईने नांदूर येथे धान्य घेतले आहे. तिला ते ओझे झेपत नाही. आपण घेऊन येऊ, असे बोलून बरडफाटा परिसरातील सेंद्रीच्या पिकामधून जाताना लक्ष्मण याने बळजबरीने गोळी खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
सदर पीडित मुलगी, आई - वडिल व इतर नातेवाईकांनी तक्रार न दिल्यामुळे सरकार पक्षाच्या वतीने नेकनूर पोलीस ठाण्यात महिला पोलीस नाईक आशा चौरे यांच्या फिर्यादीवरुन बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. नेकनूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी या प्रकरणात सखोल तपास करुन आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्या. प्राची कुलकर्णी यांच्या न्यायालयात झाली. आरोपीविरुद्ध गुन्हा सिध्द करण्यासाठी सरकार पक्षाच्या वतीने एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. याप्रकरणात पीडित मुलगी, तिची आई, वैद्यकीय पुरावा व इतर पुराव्याचे अवलोकन करुन तसेच सहायक सरकारी वकील अॅड. राख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपी लक्ष्मण सुदाम तोगे यास कलम ३७६ प्रकरणी दोषी ठरवून १२ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
अॅड. राख यांना जिल्हा सरकारी वकील अजय राख, सहायक सरकारी वकील अनिल तिडके, आर. बी. बिरंगळ, ए. पी. हसेगावकर, एस. व्ही. सुलाखे यांनी तसेच या प्रकरणी पैरवी अधिकारी सी. ए. इंगळे व पोलीस कर्मचारी पालवे यांनी सहकार्य केले.