१३ तांड्यावरील बंजारा समाज एकवटला; बीड-नगर महामार्गावर रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2023 03:38 PM2023-06-19T15:38:29+5:302023-06-19T15:38:56+5:30
विविध मागण्यांसाठी बीड-नगर महामार्गावर गोरसेनेच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले
- नितीन कांबळे
कडा (बीड) : राजपूत भामटा जातीतून 'भामटा' हा शब्द हटविण्यात येऊ नये, विमुक्त जाती (VJA) प्रवर्गामध्ये खोटे राजपूत घुसखोरी करत आहेत, त्यावर उपाययोजना करावी, यासह विविध मागण्यांसाठी आंदोलकांनी बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील वाघळूज येथे आज रस्तारोको आंदोलन केले.
महाराष्ट्रात विमुक्त जाती (VJA) या प्रवर्गामध्ये खोटे राजपूत भामटा मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करत आहेत, ही घुसखोरी कायम स्वरूपी बंद करावी, राजपूत भामटा जातीतून भामटा हा शब्द हटविण्यात येऊ नये, यासाठी गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण याच्या मार्गदर्शनाखाली आष्टी तालुक्यातील १३ तांड्यावरील बंजारा समाज आज रस्त्यावर उतरला. आंदोलकांनी बीड-नगर महामार्ग रस्तारोको करून बंद केला.
यावेळी गोरसेना तालुकाध्यक्ष अरविंद चव्हाण, अंकुश पवार, नवीनलाल राठोड, अजय चव्हाण, व्हिलन चव्हाण, अमोल पवार, अभिषेक राठोड, सतीष राठोड, मनोज राठोड, राम जाधव, प्रकाश जाधव, गणेश पवार, किरण जाधव, संदीप चव्हाण, जिवन राठोड, संतोष राठोड, ज्ञानेश्वर राठोड, रोहन राठोड, जीवन राठोड यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. अंभोरा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवि देशमाने, पोलिस कर्मचारी मुकुंद एकशिंगे, लुईस पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला. महसूलचे मंडळाधिकारी अरुण जवजांळ, तलाठी बापू गव्हाणे यांनी निवेदन स्विकारल्यानंतर रस्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.