नातीच उठली जीवावर ! सात महिन्यांमध्ये शेती, संपत्तीच्या वादातून १४ तर कुटुंबकलहातून ८ खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 07:20 PM2021-08-30T19:20:50+5:302021-08-30T19:21:40+5:30
Crime in Beed : जिल्ह्यात शेतीचे वाद मोठ्या प्रमाणावर आहेत. न्यायालयीन प्रक्रियेत वर्षांनुवर्षे अडकलेल्या या वादामुळे मने कलुषित होतात.
बीड: जिल्ह्यात शेती, संपत्तीचे वाद आणि कौटुंबिक कलहातून खुनासारखे गंभीर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सात महिन्यांत तब्बल ३१ खून झाले. यापैकी १४ खून शेती, संपत्तीच्या वादातून झाले आहेत. कुटुंबकलहातून तब्बल ८ जणांची हत्या झाली. रक्ताची नाती परस्परांच्या जीवावर उठल्याने समाजमन सुन्न झाले. वाढत्या गुन्हेगारीला अंकुश घालण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर कायम आहे.
पाटोदा तालुक्यातील पारनेर येथे पीककर्ज काढण्याच्या क्षुल्लक कारणावरून पोटच्या मुलाने पित्याची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली. दोन मुलांसह तीन भावांवर महादेव बलभीम औटे (६०) यांच्या खुनाचा आरोप आहे. जिल्ह्यात शेतीचे वाद मोठ्या प्रमाणावर आहेत. न्यायालयीन प्रक्रियेत वर्षांनुवर्षे अडकलेल्या या वादामुळे मने कलुषित होतात. त्यातून सूडभावना वाढत जाते, पुढे नेहमीच्या वादावादीचे पर्यवसान खुनासारख्या घटनांमध्ये होते. काही कुटुंबात वडिलोपार्जित शेती-संपत्तीचे वाद धुमसत असतात, तर काही जणांचे बांधावरून शेजाऱ्यांशी वैर असते. पैशांचे व्यवहार, मोहमाया, संशय, प्रेमप्रकरण यातून देखील रक्तरंजित थरारनाट्य घडते. काही प्रकरणात दारूसारख्या घातक व्यसनातूनही खुनाच्या घटना घडतात. जिल्ह्यात गतवर्षी ५३ खून झाले होते. जुलै अखेरपर्यंत खुनाच्या ३२ घटनांची नोंद होती. यंदा जुलै अखेरपर्यंत ३१ खुनांची नोंद झाली आहे.
या घटनांनी समाजमन सुन्न
- पत्नीला नांदविण्यास पाठवत नाही म्हणून बसथांब्यासमोर संतापलेल्या जावयाने सासूवर कोयत्याने वार करून खून केला होता. २५ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. साळेगाव (ता. केज) येथे ही घटना घडली होती.
- पिंपळनेर ठाणे हद्दीत मुलानेच जन्मदात्या वडिलांना संपविले होते. शिवाय नागापूर (खु.) येथे वैरभावनेने गावातीलच युवकाने सख्ख्या भावांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली होती. दोन्ही घटनांनी परिसर हादरला.
- घाटशिळ पारगाव (ता. शिरूर) येथे १९ जून रोजी मुलाने आई- वडिलांना दगड, लाकडी दांड्याने अमानुष मारहाण केली होती. यात आईचा मृत्यू झाला होता. मन हेलावणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
- वंशाला दिवाच हवा म्हणून औरंगपूर (ता. बीड) शिवारात दारूच्या नशेत तर्र पतीने पत्नीचे हातपाय बांधून लाकडी दांड्याने मारहाण केली. नडग्यांना जबर इजा पोहोचल्याने रात्रभर विव्हळत तिने प्राण सोडले होते.
संवादातून वाद मिटले जाऊ शकतात
शेतीचे वाद मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यातून प्राणघातक हल्ले व खुनासारख्या घटना घडतात. काहीवेळा अचानक घटना घडतात. काही वादविवाद परस्पर सहमतीने संवादातून मिटले जाऊ शकतात. दुर्दैवाने अशा घटना घडल्यानंतर आरोपींविरुद्ध अधिकाधिक पुरावे गोळा करून संबंधितास शिक्षेपर्यंत पोहोचवून पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न केला जातो.
- आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड
कशामुळे किती खून...
कौटुंबिक कलह ८
शेती, संपत्ती, पैशांचा वाद १४
अनैतिक संबंध ०१
वैयक्तिक शत्रुत्व ०२
हुंडा ०१
इतर कारण ०५