मुंबईला जाण्यास नकार दिल्याने एस.टी.चे 14 कर्मचारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 08:30 AM2021-03-29T08:30:54+5:302021-03-29T08:31:21+5:30
ST News : जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या बसवाहक, चालकांना मुंबई येथील बेस्ट सेवेसाठी जबरदस्तीने पाठवण्यात येत आहे. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत.
- संजय खाकरे
परळी (जि. बीड) : जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या बसवाहक, चालकांना मुंबई येथील बेस्ट सेवेसाठी जबरदस्तीने पाठवण्यात येत आहे. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. दरम्यान, बसवाहक व चालकांनी मुंबईत बेस्ट ड्यूटीसाठी जाण्यास नकार दिल्याने परळी आगारातील १४ बसचालक- वाहकांना शनिवारी निलंबित केले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या या कारवाईमुळे परळीतील बसवाहक- चालक हादरून गेले आहेत.
गेल्या सहा महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठविण्यात येत आहे. परळी एसटी आगारात ३५४ कर्मचारी असून, या सर्वांना बेस्ट सेवेसाठी मुंबईला आतापर्यंत पाठविण्यात आले आहे. मुंबईला गेलेले अनेक कर्मचारी ड्यूटी केल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. आपण मुंबईला ड्यूटी केल्यानंतर दोन वेळा पॉझिटिव्ह आल्याचे रापम कर्मचारी विश्वनाथ जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मुंबईत बेस्टच्या सेवेसाठी जाण्यास नकार देणाऱ्या परळी येथील १४ कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काढले आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय व विशेष साहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात जाऊन कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांनी व्यथा मांडली. यावेळी उत्तम मोरे, दयानंद गीते, मोहन गीते, गोपीनाथ मुरकुटे, प्रदीप, विश्वनाथ जाधव, विष्णू सातभाई उपस्थित होते.
सुरळीतपणा आणण्यासाठी नाइलाजास्तव कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढावे लागले. कर्मचाऱ्यांनी कर्तव्याचा भाग म्हणून ड्यूटी करावी.
-प्रवीण भोंडवे,
आगारप्रमुख, परळी
जीव धोक्यात घालून कोण जाणार?
मुंबईत कोरोनाचा कहर चालू आहे. अशा परिस्थितीत जीव धोक्यात घालून बीड जिल्ह्यातून आम्ही जावे कसे? याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न एसटी कामगार सेनेचे परळी शाखेचे सचिव मोहन गीते यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांतील एस.टी. कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठविण्यात येत नाही. मग बीड जिल्ह्यातीलच एसटीचे वाहक, चालक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांना बेस्टच्या सेवेसाठी का पाठवले जाते? असा सवालही गीते यांनी केला.
लस दिली नाही
nएसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना प्रतिबंधक लसही दिली नाही. मुंबईहून आल्यानंतर स्वतःहून टेस्ट करावी लागत आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी कुठलेही नियोजन केले नसल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी मात्र, तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.