मृतदेहाची १५ तास हेळसांड; डॉक्टरच्या निलंबनासाठी अख्खे गाव एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 01:58 PM2021-12-01T13:58:40+5:302021-12-01T13:59:52+5:30
कुप्पा आरोग्य केंद्रात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयवंत मोरे, टीएचओ डॉ.ज्ञानेश्वर निपटे, डॉ.पी.के.पिंगळे, संदीपान मांडवे यांनी ठाण मांडत चौकशी केली.
बीड : वडवणी तालुक्यातील कुप्पा आरोग्य केंद्रात एका मृतदेहाची तब्बल १५ तास हेळसांड झाल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला होता. या प्रकरणाची आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे समितीने अहवाल सादर केला आहे. तसेच नातेवाईकांना उद्धट वागणूक देणाऱ्या महिला डॉक्टरला निलंबित करावे, या मागणीसाठी कुप्पा ग्रामस्थ एकवटले असून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे.
नितीन सावंत या शेकऱ्याचा रस्ता अपघातात रविवारी रात्री मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह रात्रभर उघड्यावर होता तर नातेवाईक बाहेर थंडीत कुडकूडत थांबल्याचा संतापजनक प्रकार 'लोकमत'ने उघडकीस आला होता. या प्रकारानंतर मंगळवारी सकाळीच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. अगदह जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यापासून ते आरोग्य विभागाचे मुख्य सचिव, मंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली. मुख्य सचिव डॉ. व्यास यांच्या आदेशानुसान सहसंचालक डॉ. कंदेवाड यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र काढून याची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे मंगळवारी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत मोरे, साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे, संदीपान मांडवे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर निपटे यांना सोबत घेऊन चौकशी पूर्ण केली. याचा अहवाल तत्काळ सचिवांना पाठविण्यात आला. दरम्यान, उशिरा येणाऱ्या डॉ. मंजूश्री डुलेवार यांना जाब विचारणाऱ्या नातेवाईकांना अरेरावी करत गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या या महिला डॉक्टरची जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. या डॉक्टरला निलंबित करा, अन्यथा ५ डिसेंबर रोजी अर्धनग्न आंदोलन करू, असा इशारा नातेवाईक, ग्रामस्थांनी दिला आहे.
परिचारिका म्हणतात, मी डॉक्टरला कळविले
सावंत यांना अपघातानंतर आरोग्य केंद्रात दाखल केले. यावेळी येथे सीमा रोडे नामक परिचारिका उपस्थित होत्या. त्यांनी तपासले असता सावंत यांच्या नाक, तोंड आणि कानातून रक्ताच्या धारा लागल्या होत्या. परंतु नाडीची हालचाल दिसत नसल्याने आपण तोंडीच बीडला रेफर केल्याचा जबाब रोडे यांनी दिला आहे. रात्री मृतदेह परत आणल्यावरही आपण लगेच डॉक्टरांना कळविल्याचे त्यांनी म्हटले आहे. चालक, शिपाई व अन्य कर्मचाऱ्यांनीही डॉक्टरला कळविल्याचा जबाब दिला आहे.
फौजदारी गुन्हा अन् १ वर्षांची शिक्षा
मृतदेहाची हेळसांड केल्याचे उघड झाल्यास संबंधितावर भारतीय दंड संहिता कलम २९७ नुसार गुन्हा दाखल होता. यात एक वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. कुप्पा प्रकरणातही मृतदेहाची हेळसांड झाल्याचे सिद्ध होत असून समितीनेही तसाच अहवाल पाठविला आहे. संबंधितांचे केवळ निलंबणच नव्हे तर गुन्हाही दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
कारवाई केली जाईल
कुप्पा आरोग्य केंद्रातील प्रकरणाची चौकशी करून सहसंचालक व मुख्य सचिवांना अहवाल पाठविला आहे. तसेच आमच्याकडूनही नोटीस बजावली आहे. लवकरच यावर कारवाई केली जाईल.
-डॉ.रौफ शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड