परळी येथील 'वैद्यनाथ' दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, कुटुंबियांना प्रत्येकी ६ लाख तर जखमींना दीड लाख रूपये मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 06:39 PM2017-12-09T18:39:24+5:302017-12-09T20:39:59+5:30
पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात शुक्रवारी ऊसाचा रसाची गरम टाकी फुटून दुर्घटना झाली होती. यात जखमी झालेल्या 12 कर्मचा-यां पैकी 5 कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे.
परळी (बीड) : पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात शुक्रवारी ऊसाचा रसाची गरम टाकी फुटून दुर्घटना झाली होती. यात जखमी झालेल्या 12 कर्मचा-यां पैकी 5 कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. यातील मृतांच्या नातेवाईकांना ६ लाखाची तर जखमींना दीड लाख रुपयाची मदत देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री व वैद्यनाथ कारखान्याच्या संचालक पंकजा मुंडे यांनी दिली.
मधुकर आदनाथ, सुभाष कराड, गौतम घुमरे, सुनील भंडारे, सुमेध भंडारे हे १०० टक्के भाजले होते. डीप बर्न झाल्याने उपरोक्त पाच जणांचा मृत्यू झाला. एकूण १२ जण जखमी झाले. त्यात ८ जणांची प्रकृती चिंताजनक होती. त्यातील ५ जण दगावले आहेत. यासंदर्भात प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने म्हणाले, दाखल ९ जणांपैकी ८ जण अतिगंभीर होते. फुल थिकनेस बर्न असल्याने जीविताला धोका निर्माण होतो. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रितम मुंडे, कारखान्याच्या संचालिका अॅड. यशश्री मुंडे यांनी आज लातूर येथे जाऊन जखमींची भेट घेतली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना मुंडे म्हणाल्या, झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, मयत व जखमी कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांच्या आम्ही पाठिशी आहोत. कारखान्यातील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना कारखान्यातर्फे तीन लाख, मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रुपये आणि माझे वैयक्तिक एक लाख असे एकूण सहा लाख रुपये, कंत्राटदारांच्या मयत मजूरांना मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख व मुंडे कुटूंबातर्फे एक लाख असे एकूण तीन लाख रुपये मदत देण्यात येईल. तसेच जखमी कर्मचाऱ्यांना मुंडे कुटूंबातर्फे एक लाख व मुख्यमंत्री सहायता निधीतून पन्नास हजार रुपये असे दीड लाख रुपये मदत देण्यात येईल. यासोबतच मृताच्या कुटुंबातील एका व्यक्तीला वैद्यनाथ कारखान्यात नोकरी देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुंडे भगिनींना पाहताच नातेवाईकांना झाल्या भावना अनावर
मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रितम मुंडे व कारखान्याच्या संचालिका अॅड. यशश्रीमुंडे यांनी रूग्णालयात जाऊन जखमी व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली व त्यांना धीर दिला. यावेळी मुंडे भगिनींना पाहताच जखमींच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाले.