उद्योगपतीला घरी बोलावून काढला अश्लील व्हिडिओ; ब्लॅकमेल करत मागितली १५ लाख खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 01:57 PM2020-07-27T13:57:49+5:302020-07-27T14:14:45+5:30
व्हिडिओ आम्ही व्हायरल करू, असा दम देत १५ लाख रुपयांची खंडणी मागितली.
बीड : वीटभट्टीचालकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून १५ लाखांच्या खंडणीसाठी जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री एक पोलीस, दोन महिलांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना अटक करण्यात आली असून, इतर फरार आहेत.
आष्टी येथील एका महिलेने भ्रमणध्वनीवरून नितीन रघुनाथ बारगजे (रा. टाकळी, ता. केज) या तरुणास फोन करून मांजरसुंबा येथे बोलावून घेतले. माझ्यासोबत कोणी नाही, मला पाटोद्यापर्यंत सोडा, असे म्हणत पुढे आष्टीपर्यंत नेले. घरी गेल्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने बारगजे यांना रूममध्ये कोंडून जबरदस्तीने लगट करतानाचा व्हिडिओ महिलेच्या साथीदारांनी काढला. हा व्हिडिओ आम्ही व्हायरल करू, असा दम देत १५ लाख रुपयांची खंडणी मागितली. महिलेचा साथीदार पैसे घेण्यासाठी त्या वीटभट्टीचालकासोबत थेट केज तालुक्यातील टाकळी गावात पोहोचले. केज येथे आल्यानंतर बारगजे यांनी आपल्या मित्र व नातेवाईकांकडे दहा लाख रुपये हातउसने मागितले.
यात काही तरी वेगळा प्रकार असल्याचा संशय त्यांना आला. ‘तुमचे अन्य लोक पैशासाठी बोलवा, व्हिडीओ क्लिप डिलिट करून प्रश्न कायमचा मिटवा, तुमचे पैसे देऊन टाकू’, असे बारगजे आणि मित्रांनी म्हटल्यानंतर संबंधिताने आपले साथीदार केजमध्ये बोलवून घेतले. त्यावेळी चारचाकीमधून तिघेजण त्याठिकाणी आले. नितीन बारगजे याच्याकडून खंडणी वसूल करणाऱ्या शेखर वेदपाठक यास पोलिसांनी अटक केली, अन्य आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले.
नेकनूर पोलीस ठाण्यात आरोपी प्रशांत श्रीखंडे, योगेश मुटकुळे, वैभव पोकळे, शेखर वेदपाठक, सुरेखा कदम, सविता वैद्य व कटात सामील असणारा पोलीस कर्मचारी कैलास गुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस,कर्मचारी एल.व्ही. केंद्रे यांनी भेट दिली. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस भारत राऊत हे करत आहेत.
यापूर्वी प्राध्यापकाला मागितली होती खंडणी
याच प्रकरणातील सविता वैद्य या महिलेने बीड येथील एका गुंडाच्या माध्यमातून व्हिडीओ व्हायरल करण्याची भिती दाखवत एका गुंडाच्या माध्यमातून गेवराई येथील एका प्राध्यापकास असेच अडकवून २० लाखांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी देखील सविताच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दोन महिलांसह तिघे अटकेत
या प्रकरणातील आरोपी शेखर वेदपाठक, सविता वैद्य व सुरेखा शिंदे या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेचे विजय गोसावी आणि त्यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यापैकी शेखर वेदपाठक याला न्यायालयात हजर केले असता त्याला ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुरेखा कदम हिने सुरेखा शिंदे असे खोटे नाव सांगितल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.