वर्षभरात १५ गर्भवती पॉझिटिव्ह; सर्वच बाळंतिणींची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:30 AM2021-04-14T04:30:31+5:302021-04-14T04:30:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत तब्बल १५ गर्भवतींना कोरोनाने घेरले आहे. परंतु ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत तब्बल १५ गर्भवतींना कोरोनाने घेरले आहे. परंतु त्या घाबरल्या नाहीत. जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञांनी त्यांची सुखरूप प्रसुती केली. त्यानंतर जन्मलेल्या बाळाची चाचणी केली असता आतापर्यंत एकही बाळ कोरोना पॉझिटिव्ह आढळले नाही. या सर्वांनी कोरोनाशी दोन हात करून त्यावर मात केली आहे. रुग्णालयात असताना डॉक्टर, परिचारिकांनी त्यांना मायेची ऊब दिल्याने त्यांचे मनोबल उंचावले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, मेट्रन संगीता दिंडकर यांच्या मार्गदर्शनखाली प्रतिभा शिंगाडे, वंदना उबाळे, सविता गायकवाड, शितल साबळे, शामल पवार, सुजित डाके, प्रियंका धन्वे, सीमा मस्के, शितल जोगदंड, प्रगती जाधव, दैवशाला वीर, क्रांती वाघमारे, प्राजक्ता कुडके यांच्यासह सर्व स्त्रीरोग तज्ज्ञ, कक्षसेवक येथे कर्तव्य बजावत आहेत. या मातांची कोरोनामुक्त होईपर्यंत हे सर्व काळजी घेत आहेत.
गर्भवती महिलेसाठी स्वतंत्र वाॅर्ड तयार
एखादी गर्भवती महिला जिल्हा रुग्णालयात दाखल झाली आणि संशयित वाटली तर तत्काळ कोरोना चाचणी केली जाते. दुर्दैवाने पॉझिटिव्ह आल्यास कोरोना कक्षात आणून त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार केला. येथे नॉर्मल व सिझरची व्यवस्था आहे. यासाठी स्वतंत्र शस्त्रक्रियागृहही आहे. ठणठणीत होईपर्यंत त्यांच्यावरच स्वतंत्र कक्षात उपचार केले जातात.
बाळ अन् आईची व्हिडिओ कॉलवर भेट
कोरोनाच्या सुरुवातीलाच गेवराई तालुक्यातील गर्भवती बाधित आढळली. तिची प्रसुती सुखरूप झाली. नंतर बाळाची चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. म्हणून नातेवाईकांनी बाळ घरी नेले. रुग्णालयातून आई आणि बाळाची भेट केवळ व्हिडिओ कॉलद्वारे होत होती. परिचारिकांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच रोजच्या रोज स्त्रीरोग तज्ज्ञांकडून मातेची तपासणी केली जात आहे. बालरोगतज्ज्ञ नातेवाईकांच्या संपर्कात होते. आतापर्यंत जेवढे बाळ जन्मले ते सर्व निगेटिव्ह आहेत. आईच्या नजरेत राहून त्यांनी उपचार घेतले आहेत. हे अनुभव आईसाठी अविस्मरणीय राहिले. जिल्हा रुग्णालयात आलेली एखादी गर्भवती कोरोना संशयित वाटली तर चाचणी केली जाते. दुर्दैवाने बाधित आढळली तर तिची प्रसुती आणि उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार केलेला आहे. स्त्री रोग तज्ज्ञ, परिचारिका त्यांची नियमित काळजी घेण्यासह त्यांना आधार देतात. आतापर्यंत सर्वच माता कोरोनावर मात करून घरी परतल्या आहेत. ही सर्वांसाठीच सुखद वार्ता आहे.
- डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक
===Photopath===
130421\13_2_bed_1_13042021_14.jpg
===Caption===
डॉ.सूर्यकांत गित्ते