जिल्ह्यात १५०० रिक्षाचालकांना मिळणार दीड हजार रुपयांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:33 AM2021-04-16T04:33:43+5:302021-04-16T04:33:43+5:30
बीड : राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यभरात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले. खासगी वाहतूक बंद करण्यात ...
बीड : राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यभरात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले. खासगी वाहतूक बंद करण्यात आली. यात रिक्षाचालकांचाही समावेश आहे. त्यांची उपासमार होऊ नये, यासाठी त्यांना दीड हजार रुपये मदत सरकारने जाहीर केली आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यात जवळपास १,५०० रिक्षांची नोंदणी असल्याचे सांगण्यात आले. परंतु या सर्वांना मदत मिळणार का? इतर रिक्षा चालकांचे काय, तसेच टॅक्सी, जीप चालकांचे काय, असे प्रश्नही उपस्थित होत आहेत.
सरकारने एक तर मदत वाढवावी, अन्यथा निर्बंध घालून रिक्षा चालविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी चालकांमधून होत आहे. दीड हजारात बँकेचे हप्ता आणि कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा, असा प्रश्न ते विचारत आहेत.
रिक्षाचालकांच्या प्रतिक्रिया
दोन वर्षांपूर्वीच नवा रिक्षा घेतला. काही दिवस सुखाने गेले. नंतर काेरोनामुळे लॉकडाऊन लागले. त्यामुळे रिक्षा जागेवरच थांबला होता. आता हप्ता कसा फेडायचा, असा प्रश्न आहे. शासनाने १,५०० रुपये देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.
- मनोजकुमार शिंदे
१५०० रुपयांत काय होणार आहे? किराणा भरायला गेले तर कमीत कमी ४ हजार रुपये लागतात. आता या दीड हजारात दवाखाना, घरखर्च कसा भागणार? त्यामुळे आम्हाला नियमांचे बंधन घालून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी द्यावी, एवढीच मागणी आहे.
- सय्यद मुनाफ
गतवर्षीच्या लॉकडाऊनमध्ये बसूनच दिवस काढले. त्यामुळे उपासमार झाली. आता तरी १,५०० रुपये देऊन शासनाने थोडीफार मदत केली. परंतु यावर कुटुंब चालत नाहीत. एक तर मदत वाढवावी, किंवा रिक्षा चालविण्यास परवानगी द्यावी. -पांडुरंग काळे