केज तालुक्यातील २०,६७८ कृषिपंपधारक शेतकऱ्याकडे १५१ कोटींची थकबाकी; ५५० शेतकऱ्यांनी भरले ३६ लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:32 AM2021-02-13T04:32:42+5:302021-02-13T04:32:42+5:30
केज : केज तालुक्यातील २० हजार ६७८ कृषिपंपधारक शेतकऱ्याकडे १५१ कोटी ९४ लाख रुपयांची थकबाकी थकली असल्याने वीजबिलाच्या ...
केज : केज तालुक्यातील २० हजार ६७८ कृषिपंपधारक शेतकऱ्याकडे १५१ कोटी ९४ लाख रुपयांची थकबाकी थकली असल्याने वीजबिलाच्या मागणीसाठी वीज कर्मचारी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीज बिलाची थकबाकी भरणा करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान गुरुवारपर्यंत ५५० शेतकऱ्यांनी ३६ लाख रुपयांचा वीजबिलाचा भरणा केला केला असल्याची माहिती केज विद्युत वितरण कंपनीचे सहायक अभियंता राजेश आंबेकर यांनी लोकमतला दिली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आधीच आर्थिक परिस्थितीने खालावलेल्या शेतकरी सावरत असतानाच वीज वितरण कंपनी वीज बिलाच्या वसुलीसाठी शेतकऱ्याच्या शेती पंपाचा वीजपुरवठा तोडत असल्याने हाती आलेल्या पिकांचे पाण्याअभावी नुकसान होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली. केज तालुक्यात यावर्षी दमदार झालेल्या पावसाने शेतकरी सुखावलेला असतानाच
शेतकऱ्यांना कोरोनाचा फटका बसल्याने शेती मालाचे बाजारभाव घसरल्याने
शेतकऱ्यांना आर्थिक झळ सहन करावी लागली असे असतानाही शेतकऱ्यांनी
रबीच्या हंगामात शेतात गहू ,ज्वारी ,हरभरा ,ऊस आदी पाण्यावरच्या पिकाची
लागवड केली. ही पिके शेतात बहरात असतानाच वीज वितरण कंपनीकडून शेतातील कृषिपंपांना दिलेल्या विजेच्या बिलाची वसुलीची मोहीम राबविण्यास सुरवात करण्यात आल्याने वीजबिलाच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ लागल्याने शेतातील पिके पाण्याअभावी वाळून जाऊ लागली आहेत.
केज तालुक्यात एकूण २० हजार ६७८ कृषिपंपधारक शेतकऱ्याकडे १५१ कोटी ९४ लाख रुपयांची थकबाकी थकली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीचे पथक तालुक्यातील कानडी बदन, कुंबेफळ, सुर्डी, जवळबन आदी गावांत वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता राजेश आंबेकर यांनी जाऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेत वीज वितरण कंपनीच्या योजनांची माहिती देत वीजबिलाच्या अर्धी रक्कम एकरकमी भरल्यास पूर्ण वीजबिल माफी होणार, याबाबत माहिती दिली व
शेतकऱ्यांना वीजबिल भरणा करावा यासाठी प्रवृत्त केल्याने ११ फेब्रुवारीपर्यंत तालुक्यातील ५५० शेतकऱ्यांनी कृषिपंपाच्या वीजबिलापोटी ३६ लाख रुपयांचा भरणा केला असल्याची माहिती आंबेकर यांनी लोकमतला दिली आहे.
पिके ऐन बहरात असतानाच वीज कंपनी शेती पंपाच्या वीजबिलाची
वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करत असल्याने शेतकऱ्याच्या शेतातील पिके
हातात पडण्यापूर्वीच शेतात पाण्याअभावी वाळून जातील व या नुकसानीस वीज वितरण कंपनी जिमेदार असल्याचे अरुण करपे या शेतकऱ्याने सांगितले.
कृषी वीजबिल सवलत योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ कृषी वीजबिल सवलत योजनेअंतर्गत कृषिपंपाच्या पूर्ण रकमेपैकी ५० टक्के रक्कम एक रक्कमी भरल्यास त्या शेतकऱ्याचे पूर्ण वीजबिल माफ करण्यात येणार आहे, मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. याबाबत सहायक अभियंता राजेश आंबेकर यांना विचारणा केली असता त्यांनीही यास दुजोरा दिला आहे.