घातपात की अपघात? भाकरीचे शिळे तुकडे खाल्याने १६ मेंढ्यांचा मृत्यू, ३२ बचावल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 02:17 PM2022-10-10T14:17:52+5:302022-10-10T18:13:54+5:30
विषबाधा झालेल्या मेंढ्यावर तत्काळ उपचार सुरू केल्याने इतर मेंढ्या वाचल्या.
घाटनांदूर (बीड) : शिळ्या भाकरीचे तुकडे खाल्याने विषबाधा होऊन १६ मेंढ्या दगावल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घाटनांदूर परिसरात घडली. अत्यवस्थ असलेल्या ३२ मेंढ्यांवर पशुवैद्यकीय चिकित्सकांनी तातडीने उपचार केल्याने त्या बचावल्या आहेत.
येथील मेंढपाळ शंकर दगडू वैद्य यांच्याकडे मेंढ्याचे मोठे दलेर असून पिल्ले घरी ठेवून संपूर्ण मेंढ्या आपल्या शेतात चरावयास नेत होते. दौंडवाडी जाणाऱ्या रस्त्याने बाग नामक शेताच्या पुढे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने भाकरीचे वाळलेले टुकडे रस्त्यावरच ज्वारीच्या ढिगात टाकलेले होते. ते मेंढ्यांनी खालले. यानंतर मेंढ्या जागेवरच कोसळण्यास सुरुवात झाली. मेंढ्या मरत असल्याचे लक्षात येताच शंकर वैद्य यांनी आपला मुलगा त्र्यंबक वैद्य व इतरांना माहिती दिली.
तत्काळ पशुवैद्यक डॉक्टरांना पाचारण करून झाला प्रकार निदर्शनास आणला. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.बी.एल.गायकवाड, तालुका पशु लघुचिकित्सालयाचे डॉ.एस.एस.मुंडे, घाटनांदूर पशु रूग्णालयाच्या श्रेणी-१च्या वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.एस जावळे, डॉ. आर. बी. बोने आदींनी विषबाधा झालेल्या मेंढ्यावर तत्काळ उपचार सुरू केल्याने इतर मेंढ्या वाचल्या.