‘नीट’साठी बीडमध्ये १७ केंद्र; ५ हजार विद्यार्थ्यांची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:57 AM2019-04-29T00:57:14+5:302019-04-29T00:58:42+5:30
नॅशनल इलिजिब्लिीटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षा देणे बीड जिल्हा व लगतच्या गावांमधील विद्यार्थ्यांना यंदा सुलभ होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : नॅशनल इलिजिब्लिीटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षा देणे बीड जिल्हा व लगतच्या गावांमधील विद्यार्थ्यांना यंदा सुलभ होणार आहे. यावर्षी जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांची सोय बीडमध्येच होणार असल्याने पालकांचा होणारा अतिरिक्त खर्च वाचणार आहे.
नीट परीक्षा देण्यासाठी वाढती संख्या व इतरत्र दूरवर परीक्षा केंद्रांमुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यानंतर बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी बीड येथे परीक्षा केंद्र मंजूर करावे अशी मागणी पुढे आली होती. मागील वर्षी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने बीड येथे तीन परीक्षा केंद्र मंजूर केले. त्यामुळे नोंदणी केलेल्या केवळ ११४० विद्यार्थ्यांनाच बीड येथे परीक्षा देता आली. मात्र यावर्षी एकूण १७ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. जवळपास ४ हजार ९४८ विद्यार्थी परीक्षा देतील अशी व्यवस्था केल्याचे समजते.
शहरातील पोदार इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल या मुख्य केंद्राच्या अख्त्यारीत १६ अशी एकूण १७ केंदे्र आहेत. पोदार स्कूलचे प्राचार्य वाल्मिक सोमासे हे या परीक्षेचे शहर समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. प्रत्येक केंद्रावर एक प्रमुख (सेंटर सुपरिडेन्ट) असेल. पाच मे रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी सर्वतोपरी तयारी पूर्ण होत आली आहे. विद्यार्थ्यांची बीडमध्ये सोय होणार असल्याचे समाधान व्यक्त होत आहे.
केंद्रांचे झाले आॅडिट
नीट परीक्षेसाठी नॅशनल टेस्टींग एजन्सीने शहर समन्वयक प्राचार्य वाल्मिक सोमासे यांनी संभाव्य परीक्षा केंद्रांची पाहणी केली.
डेस्क, पंखा, पिण्याचे पाणी, वॉशरुम, केंद्रप्रमुखांची तयारी, परीक्षा व्यवस्थेसाठी आवश्यक मनुष्यबळाचा अहवाल पाठविला. त्यानुसार संबंधित केंद्रांना एनटीएने कळविले.
या परीक्षेसाठी १७ केंद्र प्रमुख तसेच १७ निरीक्षक असतील. शहर समन्वयक प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर केंद्रप्रमुखांचे प्रशिक्षण होणार आहे.
बीड केंद्राला प्राधान्य देणाऱ्यांना सुविधा
नीट परीक्षेसाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना बीड येथेच केंद्र सुविधा उपलब्ध होणार असल्याने बाहेरगावी जाण्याचा वेळ तसेच अतिरिक्त करावा लागणारा खर्च वाचणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना बीड जिल्हा केंद्र प्राधान्य दिले असेल त्यांना ही सुविधा मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.