१७ दिवसांच्या जुळ्या मुलींचा एकाचवेळी मृत्यू; बीडमधील घटनेत घातपाताचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 08:37 PM2019-04-13T20:37:10+5:302019-04-13T20:38:27+5:30
दोघींचाही एकाचवेळी मृत्यू होणे, हे संशयास्पद आहे.
बीड/गेवराई : ताप आल्याने १७ दिवसांच्या जुळ्या मुलींचा एकाचवेळी मृत्यू झाला. ही घटना १३ मार्च रोजी घडली होती. परंतु हे प्रकरण संशयास्पद वाटल्याने आरोग्य, पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर बरोबर एका महिन्यानंतर म्हणजेच १३ एप्रिल रोजी हे दोन्ही मृतदेह बाहेर काढून त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. या जुळ्या मुलींचा मृत्यू नेमका ताप आल्याने झाला की त्यांचा घातपात झाला? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
गेवराई तालुक्यातील निपानी जवळका येथील अनिता कुंडलिक चव्हाण (२९) ही महिला गर्भवती असल्याने काठोडा तांडा येथे माहेरी आली होती. कळा येऊ लागल्याने तिला २५ फेब्रवारीला दुपारी १२ वाजता जिल्हा रूग्णालयात दाखल केले. रात्री ८.२० वाजता तिला शस्त्रक्रीया विभागात घेतले. यामध्ये तिचे सिझेरिअन झाले आणि तिने दोन गोंडस मुलींना जन्म दिला. आईची प्रकृती स्थिर होती मात्र दोन्ही मुलींचे वजन कमी असल्याने त्यांना एसएनसीयू विभागात दाखल केले. ३ एप्रिल रोजी अनिताला जिल्हा रूग्णालयातून सुट्टी झाली होती.
दरम्यान, आशा कार्यकर्तीने गावात जावून पाहणी केल्यानंतर अनिताच्या दोन्ही मुलींचे वजन आणखी कमी झाल्याचे दिसले. तिने रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यानंतर १२ एप्रिलच्या मध्यरात्री या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला. त्या दोघींनाही जवळच एक खड्डा करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हीच बाब काही दिवसांनी ताालुका आरोग्य अधिकाऱ्यांना समजली. त्यांनी याची चौकशी केली. चौकशी पूर्ण झाल्यावर याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई यांना पत्र पाठवून चौकशी करण्याची विनंती केली. त्यांनी तलवाडा पोलीस ठाण्याला पत्र पाठविले. तलवाड्याचे सपोनि मारोती मुंडे यांच्या खबरीवरून यामध्ये आकस्मात मृत्यूची नोंद झाली होती.
शनिवारी दुपारी तहसीलदार संगिता चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय कदम, डॉ.गुट्टे, सपोनि मारोती मुंडे, पोउपनि रघुविर मुºहाडे यांच्यासमक्ष हे दोन्ही मृतदेह तब्बल महिन्यानंतर बाहेर काढले. शवविच्छेदनासाठी ते मृतदेह सायंकाळी जिल्हा रूग्णालयात आणले होते.
घातपाताचा संशय
अनिता यांना या अगोदर दोन्ही मुलीच आहेत. त्यानंतर पुन्हा त्यांना दोन जुळ्या मुलीच झाल्या. त्यामुळे त्या नैराश्यात होत्या. पोलिसांना दिलेल्या जबाबात अनिता यांनी दोन्ही मुलींचा ताप आल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. मात्र ताप आली तरी दोघींचाही एकाचवेळी मृत्यू होणे, हे संशयास्पद आहे. त्यामुळे यात घातपाताचाही संशय असू शकतो. शवविच्छेदन अहवालानंतर खरे कारण समोर येईल, असे सपोनि मारोती मुंडे यांनी सांगितले.