बीड जिल्ह्यात अकरा महिन्यामध्ये १७० शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 11:46 PM2018-12-02T23:46:59+5:302018-12-02T23:47:30+5:30
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व सततची नापिकी या कारणांमुळे दरवर्षी शेकडो शेतकरी आपली जीवनयात्रा संपवतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व सततची नापिकी या कारणांमुळे दरवर्षी शेकडो शेतकरी आपली जीवनयात्रा संपवतात. हे आत्महत्येचे सत्र थांबवण्यासाठी शासन तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र, मगील काही वर्षांपासून सुरु असलेले शेतकरी आत्महत्या सत्र थांबवण्यात अपयश येत असल्याचे चित्र आहे. यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या काळात १७० शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.
जिल्ह्यात पावासाचे प्रमाण अतिशय अत्यल्प आहे. त्यामुळे कायम दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यावर मात करण्यासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबवल्या जातात. मात्र, त्यांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर योग्यरित्या होत नसल्यामुळे शेतकºयांना त्याचा लाभ मिळत नाही. मात्र, कागदोपत्री त्या योजना राबवल्याचे दिसून येते.
अशाच प्रकारे जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेली बांधबंदिस्तीची कामे मोठ्या प्रमाणात केल्याचे कागदोपत्री दिसते. प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी कामे न करता बोगस बिले उचलून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. त्याची चौकशी देखील सुरु असून, परळी जलयुक्त घोटाळा प्रकरणी अनेक अधिकारी निलंबित झाले आहेत.
त्यामुळे शेतकºयांसाठी राबवलेल्या योजना योग्य रीत्या राबवल्या जात नाहीत म्हणून आत्महत्या वाढल्याची प्रतिक्रिया बीड तालुक्यातील हिंगणी येथील शेतकरी सूरज बांगर यांनी दिली.
...तरच आत्महत्या सत्र थांबेल !
४जिल्ह्यातील मुख्य पीक कापूस आहे. मात्र, मागील हंगामामध्ये भाव नसल्यामुळे व यावर्षी बोंडअळी प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यासाठी शासनाच्या वतीने २५६ कोटी रुपयांची मदत तीन टप्प्यात करण्यात आली. ती मदत शेतकºयांना तात्काळ मिळणे गरजेचे होते. मात्र, अनेक ठिकाणी अद्यापही बोंडअळी अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे शासनाच्या वतीने राबवण्यात येणाºया योजनांची अंमलबजावणी योग्यरीत्या होऊन त्याचा लाभ खºया शेतकºयांना होणे गरजेचे आहे. तरच हे आत्महत्या सत्र थांबेल अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे कालिदास अपेट यांनी दिली.
शाश्वत पाणीसाठा निर्मितीची आवश्यकता
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार, नाम, पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे अनेक ठिकाणी दर्जेदार झाली आहेत. त्याठिकाणी या दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील पाणीपातळीत घट झालेली नाही. मात्र, शासनाची जलयुक्त शिवार योजना योग्य राबवणे आवश्यक असल्याचे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.